Voice of Eastern

मुंबई : 

राज्यातील कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आता राज्याच्या विविध आयटीआयमधून प्रशिक्षण घेणार्‍या व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभागाच्या माध्यमातून कंबर कसली आहे. वर्षभरामध्ये एक लाख तरुणांना अ‍ॅप्रेंटीसशीप संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजने’अंतर्गत संचालनालयाने ठेवले आहे. त्यासाठी मे महिन्याच्या प्रारंभीपासून नोंदणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील कामगार स्थलांतरित झाल्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील आयटीआय तसेच किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणार्‍या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा पाच हजार यापैकी कमी असलेले विद्यावेतन सरकारकडून दिले जाणार आहे. तसेच मुलभूत प्रशिक्षण देणार्‍या संस्थांना प्रतितास २० रुपये या दराने जास्तीत जास्त ५०० तासांसाठी प्रशिक्षण खर्च देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने ते तीन वर्ष इतका असणार असून या योजनेंतर्गत प्रशिक्षित व अप्रशिक्षित उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात उपयोगी पडतील अशा ८१५ व्यवसायांना ही योजना लागू केली असल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना व बेरोजगार तरुणांना होणार आहे. या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व स्वयंरोजगारक्षम व्हावे यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने वर्षभरात एक लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मे महिन्यामध्ये या योजनेंतर्गत नोंदणीस सुरुवात होणार आहे. केंद्राच्या योजनेत राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गतही अर्ज करता येणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायकडून देण्यात आली आहे.

Related posts

भारतीय संविधान घराघरात, मनामनात रुजणार! – प्रा.वर्षा गायकवाड 

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता बोलक्या संरक्षक भिंती

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राईज’चे हिंदी व्हर्जन या तारखेला येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Leave a Comment