मुंबई :
बेकायदेशीर पार्किंग करण्यासाठी आजाद मैदान वाहतूक पोलीस विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकाने तीन हजारांची लाच मागितली. परंतु ही लाच मागणे त्यांच्या अंगलट आले आहे. लाच घेताना या महिला निरीक्षकाला अटक करण्यात आली असून तिच्या कपाटातून लाखो रुपयाचे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले आहे.
सिद्धीविनायक ट्रॅव्हेल्सच्या दोन खाजगी बस एमएमआरडीएच्या कामगारांना चेंबूर ते कफ परेड येथील कार्यालयात ने-आण करण्यासाठी वापरल्या जातात. दोन आठवड्यापूर्वी आझाद मैदान वाहतूक पोलिसांकडून या बसवर दंडात्मक कारवाई केली होती. याच संदर्भात सिद्धिविनायक ट्रॅव्हल्सचे मालक पोलीस शिपाई तुषार चव्हाण यांची भेट असती, त्यांनी पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांना भेटण्यास सांगितले. यावेळी मालटे यांनी दोन्ही बस त्यांच्या हद्दीत पार्किंग करण्यासाठी चार हजारांची लाचे मागितली. त्यामुळे त्यांनी ११ जानेवारीला शीतल मालटे आणि तुषार चव्हाण यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी रात्री सापळा लावून लाचेचा तीन हजारांचा हप्ता घेताना तुषार चव्हाणला अटक केली. ही लाच मालटे यांच्या सांगण्यावरुन घेतल्याचे त्यांनी सांगितल्यावर मालटे यांना अटक करण्यात आली. मालटे यांच्यावर केलेल्या कारवाईत त्यांच्या कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना १० कागदी लिफाफे सापडले. त्यात ४ लाख ८१ हजार ५०० रुपयांची रोकड होती. याबाबत शीतल मालटे यांना विचारणा केली असत त्यांच्याकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते. पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे.