ठाणे :
माझगाव क्रिकेट क्लबने जॉली जिमखान्याचा ७१ धावांनी पराभव करत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित मर्यादित षटकांच्या ६५ व्या शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सेंट्रल मैदानावर रंगलेल्या या निर्णायक लढतीत हृषीकेश पवार आणि अजय कदमच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे ४० षटकांमध्ये ९ फलंदाजांच्या मोबदल्यात माझगाव क्रिकेट क्लबने २३८ धावांचे आव्हान उभे केले. शतकी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या हृषीकेशने ६९ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकार ठोकत ८४ धावा केल्या. तर अजयने ३४ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारासह ४२ धावांचे योगदान दिले. प्रशांत कारिआने ५४ धावांत ४ आणि गिलख्रिस्ट प्रभाकरने २२ धावांत २ विकेट्स मिळवल्या. राजेश भुजबळ, देवांग गोसालीआ, अभय पाटीलने प्रत्येकी एक विकेट मिळवली. हे आव्हान पेलवताना जॉली जिमखान्याला ३१.१ षटकात १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. फलंदाजीतही छाप पाडताना गिलख्रिस्ट प्रभाकरने पाच चौकारासह ३८ धावा केल्या. प्रतीक म्हात्रेने ३४ धावा केल्या. संघाला विजयाचा मार्ग दाखवताना सीमांत दुबेने ४९ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. सिद्धेश दर्डे आणि तुषार चाटेने दोन फलंदाज बाद केले. यश मल्होत्राने एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक :
माझगाव क्रिकेट क्लब : ४० षटकात ९ बाद २३८ (हृषिकेश पवार ८४, अजय कदम ४२, प्रशांत करिआ ८-०-५४-४, गिलख्रिस्ट प्रभाकर ४-२२-२) विजयी विरुद्ध
जॉली जिमखाना : ३१.१ षटकात सर्वबाद १६७ (गिलख्रिस्ट प्रभाकर ३८, प्रतिक म्हात्रे ३४, सीमांत दुबे ६-४९-३, सिद्धेश दर्डे ८-१-२९-२, तुषार चाटे ६.१- २८-२).