मुंबई :
राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मिळावे यासाठी राज्यात ‘राज्य कौशल्य विकास मंडळा’ची स्थापना करण्यात आली. मात्र या मंडळाअंतर्गत संलग्न प्रशिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी अद्यापही बेरोजगार आहेत. यामुळे याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थी आणि संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम पूर्ण करता यावा. त्यांना तातडीने स्वयंरोजगार अथवा नोकरी मिळावी, यासाठी राज्यात कौशल्य विकास मंडळाची स्थापना झाली. या अंतर्गत राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात सुमारे १२६० संस्थांनी नोंदणी केली. या संस्थांच्यामार्फत विविध कौशल्याधारित विषयांचे अभ्यासक्रम शिकविले जातात. यामध्ये सुमारे ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात आणि प्रमाणपत्र तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करतात. तासिका अभ्यास पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ‘अॅप्रेंटिसशिप’ पूर्ण करणे बंधनकारक असते. मात्र या मंडळाबाबत राज्यातील उद्योग क्षेत्राला फारशी माहिती नाही. तसेच मंडळातील विद्यार्थ्यांना ‘अॅप्रेंटिसशिप’ घ्यावे, अशी कोणतीही सूचना नसल्याने या विद्यार्थ्यांना कामाची संधी मिळाली नाही. परिणामी २०१७ पासून शिक्षण पूर्ण केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली नाही. याबाबत काही संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या मंडळाच्या उत्तमोत्तम अभ्यासक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने प्रयत्न व्हावेत, अशी मागणीही संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.