Voice of Eastern

मुंबई :

पैसे उकळण्यासाठी जीवे मारण्याची तसेच मुलांचे अपहरण करण्याची धमकी आजपर्यंत दिली जात होती. मात्र मुंबईतील वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलच्या मालकाला पैसे दिले नाहीस तर तुझ्यासह तुझ्या बायका मुलांना उचलून नेऊ आणि मंदिरात हिंदू बनवू, अशी थेट धर्मांतर करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराने घाबरलेल्या या व्यावसायिकाने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी येथे राहत असलेले सय्यद सफिरुल हक सफीर हे वांद्रे येथील लिकिंग रोडवरील पर्शियन दरबार हॉटेलमध्ये कॅशिअर म्हणून काम करतात. त्यांच्यावर काऊंटर कॅशिअरसह जेवणाचे ऑर्डर आणि ऑनलाईन ऑर्डर घेण्याची जबाबदारी आहे. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे कार्यरत असताना सकाळी सव्वाअकरा वाजता एक कॉल आला. यावेळी समोरुन बोलणार्‍या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्यास सुरुवात करत तुमच्या हॉटेलमध्ये हलाल विकता का?, तुझ्या हॉटेलच्या मालकाचे नाव काय? तुझे नाव काय?तू मुस्लिम आहेस तर शिया की सुन्नी आहेस अशी विचारणा केली. यावर सफीर यांनी आपण कोण आहे अशी विचारणा केली असता मी तुझा बाप बोलतोय, तुम्हाला मुंबईत व्यवसाय करायचा आहे ना, व्यवसाय करायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या. पैसे दिले नाहीतर तुझ्यासह तुझ्या बायका मुलांना उचलून नेऊ आणि मंदिरात हिंदू बनवू अशी धमकी देत त्याने फोन कट केला. त्यानंतर दुपारी त्याने पुन्हा फोन करुन मालकाला माझ्याशी बोलायला सांग, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर त्यांनी ही माहिती हॉटेलच्या मालकांना दिली. या धमकीने त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर ते हॉटेलमध्ये आले आणि दोन्ही कर्मचार्‍यांसोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार उपस्थित पोलिसांना सांगून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरणासह जिवे मारण्याची धमकी तसेच मंदिरात हिंदू बनविण्याची धमकी दिली होती. सय्यद सफीर याच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसह अपहरण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत आहेत.

Related posts

वेतन उशिरा होण्यास राज्य सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार! – श्रीरंग बरगे यांचा आरोप

वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांची अलिबाग समुद्रकिनारी गर्दी

मुंबईला सामना करावा लागणार पाणी कपातीच्या संकटाचा

Voice of Eastern

Leave a Comment