मुंबई :
वरळी, बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटामध्ये जखमी झालेल्या चार महिन्यांच्या मुलाचा नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई फुले मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये १८ डिसेंबरला वातानुकूलित यंत्रणेत शॉट सर्किट होऊन तीन बालकांचा सेफ्टीक शॉकने मृत्यू झाला. तर दोन बालके अत्यवस्थ आहेत. या प्रकारामुळे भांडुपमधील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भांडुप येथील सावित्रीबाई फुले मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये १८ डिसेंबरला वातानुकूलित यंत्रणेत अचानक शॉट सर्किट झाला. या दुर्घटनेत एनआयसीयूमध्ये असलेल्या पाच नवजात बालकांना सेप्टिक शॉक बसला. या धक्क्यानंतर २०, २१ आणि २२ डिसेंबरला तीन मुलांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला तर दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये ओमेश्वरी मुकुंदे यांचा १४ डिसेंबरला जन्म झालेला मुलाचा मृत्यू २० डिसेंबरला, सारिका बच्छाव यांच्या १२ डिसेंबरला जन्म झालेल्या बाळाचा मृत्यू २१ डिसेंबरला आणि १५ डिसेंबरला जन्म झालेल्या नेहा मोरे यांच्या मुलाचा मृत्यह २२ डिसेंबरला झाला. जगामध्ये येऊन अवघे काही दिवस झालेल्या या बाळांचा पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रुमना कुरेषे यांची मुलगी तर सलिहा नारकर यांच्या मुलाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
सावित्रीबाई फुले मॅटर्निटी हॉस्पिटलच्या एनआयसीयूची २० खाटांची क्षमता असून सध्या १७ बालके उपचारार्थ दाखल आहेत. रुग्णालयात वातानुकूलन यंत्रणेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे बालकांचे मृत्यू झालेले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. रुग्णालयाच्या गलथानपणामुळे सदर बालकांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येत असून, या प्रकरणी गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्याची तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे गटनेता प्रभाकर शिंदे यांनी केली.
मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही. शॉर्ट सर्किटही झालेले नसून, कोणत्याही बाळाचा मृत्यू झालेला नाही. ही अफवा आहे.
– नितीन जाधव, प्रशासकीय प्रमुख, सावित्रीबाई फुले मॅटर्निटी होम