ठाणे :
फाल्कन स्पोर्ट्स क्लब आयोजित थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत आग्नेल्स संघाने पुरुष आणि महिला गटाच्या विजेतेपदासह दुहेरी यश संपादन केले. २१ वर्ष वयोगटातील मुलांच्या लढतीत सॅव्हीओ क्लबने तर मुलींमध्ये महिंद्र पार्क संघ विजेता ठरला.
ठाण्यातील शरद पवार क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्पर्धेत महिलांची अंतिम लढत रंगतदार झाली. शेवटच्या क्षणापर्यंत दोलायमान स्थितीत असलेल्या सामन्यात आग्नेल्स संघाने स्पोर्ट्सझी संघावर १३-१२ अशी बाजी मारत विजेतेपद निश्चित केले. आपल्या अचूक फेकीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या दर्शना प्रसादला या गटात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या तुलनेत आग्नेल्स संघाच्या पुरुषांना अंतिम फेरीचा पेपर सोपा गेला. निर्णायक लढतीत आग्नेल्स संघाने सॅव्हीओ क्लबचे आव्हान २०-१६ असे परतवून लावले. या गटात सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळवणाऱ्या शुभम यादवने संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.
मुलांच्या २१ वर्ष वयोगटाच्या अंतिम लढतीत सॅव्हीओ क्लबने आग्नेल्स संघाचा पराभव करत आपल्या वरीष्ठ संघाच्या पराभवाची परतफेड केली. संकल्प पांडेच्या चतुरस्त्र खेळामुळे सॅव्हीओ संघाने हा सामना १०-८ अशा फरकाने जिंकला. या गटात मुलींच्या अंतिम सामन्यात महिंद्र पार्क संघाने अग्रज्ञेय व्यायामशाळेवर ७-६ असा निसटता विजय मिळवला. महिंद्र पार्क संघाची आर्या नायर या गटातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराची मानकरी ठरली. काही वर्षांपूर्वी अनेक राष्ट्रीय बास्केटबॉलपटू घडवणाऱ्या ठाणे शहरात या खेळाला पुन्हा चालना मिळावी शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू शिबु जॉर्ज, राष्ट्रीय पातळीवर खेळलेले उदय आणि वैशाली हे दाभाडे दांपत्य, हिमांशू पांडे यांनी स्पर्धेच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. रोटरी क्लब ऑफ ग्रीनस्पॅनच्या सहकार्याने पार पडलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.