Voice of Eastern

मुंबई : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत पालकांमध्ये असलेले संभ्रमाचे वातावरण अखेर गुरूवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दूर केले. दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार असून, दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करीत परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जूनच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने सुरु होते. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान तर लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान तर लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ दरम्यान होईल.

परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

Related posts

जे. जे. सुपरस्पेशालिटी इमारतीसाठी १८ महिन्यांची मुदतवाढ

कुस्तीमध्ये वेताळ शेळके याची रुपेरी कामगिरी; नरसिंग, सोनाली, स्वाती यांना ब्रॉंझपदक

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल २०२४ पर्यंत सुरु होणार

Voice of Eastern

Leave a Comment