मुंबई :
कला संचालनालयाकडून शासकीय रेखा कला परीक्षांच्या म्हणजेच एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इंरमीजिएट कला श्रेणी परीक्षा १२ व १३ फेब्रुवारी रोजी तर एलिमेंटरी श्रेणी परीक्षा १४ व १५ फेब्रुवारीला ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येईल असे कला संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान अपवादात्मक परिस्थितीत वेळापत्रकात बदल झाल्यास त्यासंदर्भातील सूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील असे कला संचालक राजीव मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे एलिमेंटरी किंवा इंटरमीजिएट परीक्षा न झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना कला कोट्याचे वाढीव गुण कसे देणार असा प्रश्न राज्य शिक्षण मंडळासमोर निर्माण झाला होता. मात्र यंदा कला संचालनालयाने शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेआधी शासकीय रेखाकला परीक्षा देता येणार आहे. कला कोट्यातील वाढीव गुणांसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेली मुदत १५ जानेवारीला संपली आहे. दरम्यान या मुदतीत मोजक्याच शाळांनी विद्याथ्यांचे प्रस्ताव राज्य शिक्षण मंडळाला पाठविताना फक्त एलिमेंटरी पास झालेल्या आणि दोन्ही परीक्षा पास झालेले विद्यार्थी असे दोन वेगवेगळे प्रस्ताव पाठविले आहेत. कला संचालनालयाने परीक्षा घेण्याचे जाहीर केल्यामुळे शिक्षण मंडळाकडून कला कोट्याचे प्रस्ताव पाठविण्याची दिलेली मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि शाळांकडूनही ही होत आहे.