मुंबई :
दरवर्षी रस्ते अपघातात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना उपचार मिळावेत यासाठी वाहतूक विभागाने स्वयंसेवकांच्या माध्यमातून ‘हायवे मृत्युंजय दूत’ ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून स्वयंसेवकांच्या मदतीसाठी आणि रस्ते अपघातामधील मृत्यूंची संख्या कमी होण्यासाठी आता या नव्या मोहीमेत वाहतूक पोलीस आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ते अपघातात जखमी नागरिकांना पोलिसांकडून मोलाची मदत होणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा, ओव्हर स्पिडिंग यामुळे देशात दरवर्षी साधारण १.५० लाखहुन अधिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. राज्यात २०२१ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये २६ हजार २८४ पर्यंत वाढ झाली आहे. या अपघातामध्ये ११ हजार ९६० जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जखमींना गोल्डन अवरमध्ये उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच जखमींना रुग्णालयात नेताना योग्यप्रकारे न हाताळल्याने आणि हाताळणीबाबतच्या अज्ञानामुळे जखमीला अधिक इजा किंवा त्रास होण्याची दाट शक्यता असते. ही बाब लक्षात घेता अपघातात जखमी झालेल्याना तातडीने आणि योग्यरितीने रुग्णालयात नेता यावे यासाठी पोलिसांना ‘बेसिक ट्रॉमा लाईफ सपोर्ट स्किल ट्रेनिंग’ देण्यात येणार आहे. हे ट्रेनिंग महामार्ग पोलिस सेव लाईफ फाउंडेशनमार्फत देण्यात येणार आहे. सुरुवातील मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, रायगड जिल्ह्यामधील १ हजार ५०० पोलिसांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.