Voice of Eastern

मुंबई : 

राज्यात शाळेत जाणार्‍या १३ ते १५ वर्षाच्या मुलांमध्ये तंबाखूच्या वापरात ४२ टक्के घट झाली आहे. मात्र १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून तंबाखूचे सेवन करण्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणातून (ग्लोबल युथ टोबको सर्व्हे) उघडकीस आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने टाटा मेमोरियल सेंटरमध्ये सर्वेक्षणाच्या फॅक्ट शीटचे प्रकाशन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसद्वारे जीवायटीएस-४ सर्वेक्षणाची चौथी फेरी नुकतीच घेण्यात आली. या फेरीमध्ये १३ ते १५ वर्षे वयोगटातील शाळेत जाणार्‍या मुलांमध्ये तंबाखूच्या वापराचा राष्ट्रीय अंदाज घेण्यात आला. सर्वेक्षणाच्या पहिल्या तीन फेर्‍या २००३, २००६ आणि २००९ मध्ये झाल्या. चौथ्या फेरीमध्ये १३ ते १५ वर्षाच्या मुलांमध्ये तंबाखूच्या वापरात राष्ट्रीय पातळीवर ४२ टक्के घट झाल्याचे दिसून आले. ही बाब समाधानकारक असली तरी अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये १३ ते १५ वर्षे वयोगटातील ५८ टक्के विद्यार्थ्यांकडून तंबाखूचे सेवन होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या वयोगटातील तंबाखूच्या सेवनाला प्रवृत्त करणार्‍या तंबाखू घटकांची तपासणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या तंबाखूच्या वापराबद्दल महाराष्ट्रातील निकाल ५.१ टक्के असून, राष्ट्रीय सरासरी ८.५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली. शाळांसभोवतालच्या तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीच्या धोरणांमध्ये बदल करण्याची गरज असून, सुमारे ५६ टक्के अल्पवयीन मुले ही स्टोअर, पानशॉप आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडून सिगारेट, बिडी आणि इतर चघळण्यायोग्य तंबाखूजन्य पदार्थ सहजरित्या खरेदी करत असल्याचेही बडवे यांनी सांगितले.

मुलांमध्ये तंबाखूचे सेवन करणे हे भावी पिढ्यांसाठी धोकादायक आहे. शाळकरी मुलांचे मन लहान वयातच चांगल्या आणि वाईट गोष्टीकडे सहज वळण्याची एक संधी आणि धोकाही असतो. त्यामुळे तंबाखूमुळे आरोग्यास होणार्‍या धोक्यांबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित करणे महत्वाचे आहे असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

तंबाखू मुक्ती केंद्रे तसेच नॅशनल टोबॅको क्वीट लाईनअंतर्गत तंबाखू मुक्ती आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पुरवण्यावर भर दिला. राज्यात जीवायटीएस सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार कुटुंबात ७.८ टक्के आणि बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी २२ टक्के मुले ही तंबाखू सेंकड हँड स्मोकच्या संपर्कात येत आहेत याला समुपदेशनाने आणि कायदेशीर कार्यवाहीने आणि सर्वांच्या सक्रीय सहभागाने आळा घालणे शक्य करणे असल्याचे आरोग्य सेवेच्या संचालक डॉ. साधना तायडे यांनी स्पष्ट केले.

Related posts

जेव्हा पोलिसच बनतो ठग…

वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७व्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला

Leave a Comment