मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशप्रक्रिया उशीराने झाली. त्यामुळे महाविद्यालये सुरू होण्यास फेब्रुवारी उजाडला. संपूर्ण देशातील एमबीबीएसची महाविद्यालये १४ फेब्रुवारीपासून सुरू झाली, मात्र सहाय्यक प्राध्यापकांच्या असहकारामुळे सोमवारी राज्यातील १९ शासकीय महाविद्यालयात ‘डीन भाषण’ झाले नसल्याने ही महाविद्यालये सुरूच झाली नाही. वैद्यकीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी ‘डीन भाषण’ झाले नसल्याने अनेक वर्षांची गुरूमंत्रांची परंपरा खंडित झाली. तसेच प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्यानंतरही सरकारच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे एमबीबीएसचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक महाविद्यालयात अधिष्ठातांकडून विद्यार्थ्यांना गुरूमंत्र दिला जातो. एमबीबीएसच्या विद्यार्थांना गुरुंचे मौलिक मार्गदर्शन उज्जल भविष्यासाठी फार महत्त्वाचे असते. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देेशानुसार संपूर्ण देशातील वैद्यकीय महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाली. त्यानुसार सोमवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली. मात्र २७ दिवसांपासून आंदोलन करूनही सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सहाय्यक प्राध्यापकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे राज्यातील १९ शासकीय महाविद्यालयांमध्ये सोमवारी ‘डीन भाषण’ झालेच नाही. त्यामुळे एमबीबीएसच्या पहिल्या वर्गाचे विद्यार्थी हे गुरूमंत्रापासून वंचित राहिले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासामध्ये प्रथमच विद्यार्थ्यांना गुरूंचे दर्शन झाले नाही. याबद्दल शिक्षण क्षेत्रातून खंत व्यक्त करण्यात येत आहे. या डिन भाषणाच्या सर्व कार्यक्रमाची तयारी हे महाविद्यालयातील सर्व शिक्षकांकडून करण्यात येत असते. विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था, कार्यक्रमाची रुपरेषा, अधिष्ठातांचे भाषण, प्रमुख पाहुणे अशा विविध जबाबदार्या शिक्षकांकडून पार पाडण्यात येत असतात. मात्र सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करणे व सातवा वेतन आयोग लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. तसेच सचिवांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याने राज्यातील ५०० पेक्षा अधिक सहाय्यक प्राध्यापकांनी अखेर असहकाराचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न शिकवणे, महाविद्यालयाची अशैक्षणिक कामे न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे सदस्य डॉ. सचिन मुलकुटकर यांनी दिली.
विद्यार्थी, पालकांकडून सरकारविरोधात संताप
एमबीबीएसला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे गुणवत्ताधारक असतात. उत्तम गुण असल्यानेच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. वैद्यकीय शिक्षण हे स्वप्नवत असताना सरकारतर्फे एवढा हलगर्जीपणा का? अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर घडवणार्या वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा टिकवण्यास सरकारकडून धोरणात्मक निर्णयांचा अभाव दिसत आहे. २७ दिवस साखळी उपोषण करण्याची वेळ शिक्षकांवर येते. यापेक्षा दुर्देवी गोष्ट काय? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दखल घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षक हे समाजात देवदूतांना घडवण्याचे काम करतात परंतु हेच द्रोणाचार्य असे उपेक्षित राहणार का?
– डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना