Voice of Eastern
शिक्षण

बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्समध्ये ३ लाख तरुणांना प्रशिक्षण; कौशल्य विकास सोसायटी आणि आयसीएआयमध्ये सामंजस्य करार

banner
  • मुंबई

जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची वाढलेली गरज लक्षात घेऊन राज्य कौशल्य विकास सोसायटीने बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स क्षेत्रातील प्रशिक्षित तरुण घडवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यामध्ये मंगळवारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे पुढील तीन वर्षात राज्यातील तीन लाख युवक-युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह आणि आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. आयसीएआय ही केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयांतर्गत कार्यान्वित संस्था आहे. कोरोना आणि इतर आर्थिक संकटामुळे देशात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वित्तीय क्षेत्रात मनुष्यबळाची वाढती मागणी असली तरी कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. या सामंजस्य करारातून तरुणांना मिळणार्‍या प्रशिक्षणामुळे ही कमतरता दूर होईल. आयसीएआयद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये, प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण ३५० तासांचे म्हणजे सुमारे ३ ते ५ महिने चालणार असून, हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत असेल. राज्य शासनामार्फत यासाठीचा खर्च केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले. हा सामंजस्य करार ऐतिहासिक असून, अन्य राज्येही अशा उपक्रमासाठी पुढाकार घेतील. या उपक्रमातून युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगारक्षम प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल, असे आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन यांनी सांगितले.

राज्यातील विशेषत: वंचित घटकांपर्यंतही हे प्रशिक्षण पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उद्योग आणि वाढत्या आर्थिक क्षेत्राची गरज पाहता हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. मुलींना तसेच सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील युवक-युवतींना हे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल, असे कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले. राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यात येत आहे. सामंजस्य करारातून आर्थिक क्षेत्रातील प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी सांगितले.

या क्षेत्रात मिळणार प्रशिक्षण

बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाउंटींग, व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्पुटराज्ड अकाउंटींग, इ-फायलिंग

 

कोण प्रवेश घेऊ शकतो

पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे युवक, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेले युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Related posts

संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर वाचला समस्यांचा पाढा

आयडॉलच्या प्रश्नांवर सहावेळा स्थगन आणूनही समस्या जैसे थे! – सिनेट सदस्य आक्रमक

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Leave a Comment