मुंबई :
‘होळी’साठी वृक्षतोड करणार्या व्यक्तीला किमान एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असून, त्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार करण्यात येईल. तसेच दोषी व्यक्तीला किमान एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती मुंबई महापालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
‘होळी’ उत्सवासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांकडून छुप्या पद्धतीने वृक्षतोड केली जाते. बर्याचदा मोठमोठ्या झाडांच्या फांद्याही तोडल्या जातात. त्यामुळे बेकायदा होणारी ही वृक्षतोड रोखण्यासाठी पालिकेच्या उद्यान खात्याकडून सक्त मनाई केली आहे. ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत केलेल्या विविध तरतुदींमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास कारणीभूत होणे, हा कलम २१ अन्वये अपराध आहे. यानुसार अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिकडून किमान एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, संबंधित व्यक्तीला एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
१७ मार्च २०२२ रोजीच्या होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षतोड करु नये. तसेच वृक्षतोड झाल्याचे आढळल्यास पोलीस तक्रार करण्यात येणार आहे. त्यामुळे वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी महापालिका अधिकार्यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास त्वरित कळवावे. जेणेकरुन, संबंधित व्यक्तींवर कारवाई करणे शक्य होईल, असेही आवाहन जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.