मुंबई :
गुरु नानक महाविद्यालयाच्या राज्य शास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पनवेल येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी संविधान क्लबच्या विद्यार्थ्यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्राध्यापक सुमित खरात यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावून सांगितले.
डॉ. बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार या विषयावर ६ डिसेंबर रोजी गुरु नानक महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्राची सुरूवात विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता सादर करून केली. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार यावर सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर यांनी डॉ. बाबासाहेबांचे सामाजिक विचार यावर प्रकाश टाकला. महापरिनिवारण दिनानिमित्त संविधान क्लबच्या वतीने रत्नागिरी येथील ग्रंथालयाला पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. बाबासाहेबांच्या जीवनावरील चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुमित खरात यांच्या नेतृत्वात, प्राध्यापक नितेश राठोड आणि संविधान क्लब माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने करण्यात आले.