मुंबई :
जगातील एक तृतीयांश लोकांमध्ये क्षयरोगाचे संक्रमण दिसून येते. यामध्ये भारताच्या ४० टक्केपेक्षा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जीवाणू असतात. मात्र पण या ४० टक्क्यांपैकी फक्त १० टक्के व्यक्तींना क्षयरोग होणाची शक्यता असते, असे मत एनआयटी बेंगळूरूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रविचंद्र सी यांनी मांडले.
‘क्षयरोग निर्मूलनासाठी गुंतवणूक करा, आयुष्य वाचवा’ या घोषवाक्यावर यंदाची जागतिक क्षयरोग दिन २०२२ ची संकल्पना आधरित आहे. क्षयरोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर पत्र सूचना कार्यालयाने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी बेंगळूरूमधील राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे संचालक डॉ. सोमशेखर. एन आणि एनआयटी बेंगळूरूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रविचंद्र सी हे तज्ज्ञ म्हणून सहभागी झाले होते.
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. जो संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याच्या थेंबांतून सहज पसरतो आणि फुफ्फुसांवर परिणाम करतो. क्षयरोगावर वेळेत उपचार न झाल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. जगात क्षयरोग होण्याच्या घटनेत वाढ होत असून, २६ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण भारतात आढळतात. जगातील एकूण रुग्णांच्या एक चतुर्थांश रुग्ण भारतात आहेत. यामध्ये बहुऔषधे प्रतिरोध क्षयरोग तसेच एचआयव्ही क्षयरोग यांचाही समावेश आहे.
रोगप्रतिकार शक्ती खालावणे हे क्षयरोग होण्याचे सर्वसामान्य कारण आहे. एचआयव्ही, मधुमेह, फुफ्फुसांचा आजार, मद्यपान व धुम्रपान करणे, तणाव या कारणामुळे प्रकृती खालावलेल्या नागरिकांना क्षयरोग होण्याची अधिक शक्यता असते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये क्षयरोगाची लक्षणे दिसू लागतात. क्षयरोगामुळे एचआयव्ही रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. एचआयव्ही रुग्णांमध्ये क्षयरोगाचे संक्रमण वेगाने आणि पटकन होते. नखे आणि केस हे भाग वगळता शरीराच्या कोणत्याही अवयवावर क्षयरोगाचा परिणाम होऊ शकतो. शरीरात ज्या भागात रक्त पोहोचते त्या सर्व भागांवर क्षयरोगाचा परिणाम होतो, अशी माहिती डॉ सोमशेखर एन यांनी दिली.
क्षयरोगाचे प्रकार आणि लक्षणे :
फुफ्फुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस असे ढोबळमानाने क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत. फुफ्फुसांचा क्षयरोगाचा परिणाम फुफ्फुसांवर होतो तर एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीसचा परिणाम फुफ्फुसांसह अन्य अवयवांही होतो. सामान्य आणि अवयव विशिष्ट लक्षणे अशी दोन प्रकारची लक्षणे असतात. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला हे क्षयरोगाचे मुख्य लक्षण समजले जाते. भूक न लागणे, वजन कमी होणे, रात्री ताप येणे ही क्षयरोगाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. छाती दुखणे, थकवा, थुकीत रक्त येणे व झपाट्याने वजन कमी होणे ही एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलॉसिसच्या रुग्णांत आढळणारी अन्य लक्षणे आहेत.
क्षयरोगाचे प्रकार :
मिलीअरी आणि मेंदूज्वर क्षयरोग असे दोन गंभीर प्रकार आहेत. मिलीअरी क्षयरोगाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. तर मेंदूज्वराचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. यामुळे डोकेदुखी, गुंगी, ग्लानी अशी लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे लीम्फ नोड क्षयरोग हा सर्वाधिक आढळून येणारा एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस आहे. यात मानेवर सूज येते आणि किशोरवयीन मुलींमध्ये हा सर्वाधिक दिसून येतो. फुफ्फुसांच्या बाहेर असणार्या प्ल्युरामध्ये जास्त द्रव जमा होऊन खोकला आणि श्वासोच्छवासाला त्रास होतो. क्षयरोगाचे काही दुर्मिळ प्रकार आहेत. यामध्ये त्वचेचा क्षयरोग, डोळ्याचा क्षयरोग यासह अन्य काही प्रकार आहेत, ज्यांचा परिणाम हृदयाचे आवरण, आतडे आणि हाडांवर होतो.