मुंबई :
बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्यांची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा बारावीच्या गणित आणि संख्याशास्त्र पेपर फुटल्यांची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे घडली आहे. अज्ञात आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस या प्रकरणांची चौकशी करत आहेत. मात्र, सतत बारावीच्या परीक्षेचे पेपरफुटीमुळे वितरण करून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचा परीक्षा केंद्रावर इयत्ता बारावी परीक्षेचा गणित आणि संख्याशास्त्र या विषयाच्या पेपर फुटीची घटना घडली आहे. आज सकाळी १०:३० ते २:०० या वेळेत गणित आणि संख्याशास्त्र या विषयाच्या पेपरचे आयोजन करण्यात आले होते. पेपर सुरु झाल्यानंतर सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी गणित आणि संख्याशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या काही भागाचे फोटो श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वाळके यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाले. वाळके यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन अहमदनगर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी अशोक कडू यांना प्रकरणी माहिती दिली. कडूस यांनी तात्काळ श्रीगोंदा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता, परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून आले. या प्रकरणी घडलेल्या गैरमार्ग प्रकाराचे स्वरुप लक्षात घेता शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद नोंदविला आहे. पोलीस या प्रकारचा तपास करत आहे.