मुंबई :
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर २८ फेब्रुवारीला विद्यापीठाकडून अर्ज भरण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा एसटीच्या संपामुळे किंवा अन्य कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ३ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये किंवा माफ करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आल्या आहेत. त्यातच काही तांत्रिक अडचणीमुळे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा राज्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.