मुंबई :
जन्मजात बहिरेपणा असलेल्या जुळ्या भाऊ-बहिण यांच्यावर कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया मोफत करत मुंबईतील एका डॉक्टरांनी त्यांना ऐकण्याची क्षमता देत नवजीवनदान दिले आहे. खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी मोफत केली असल्याने पालकांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले पण डॉक्टरांनी मुलांना नव आयुष्य दिल्याने पालकांचा आनंद गगनात मावत नाहीये. दुसरीकडे, तब्बल दहा वर्षानंतर मुंबईत जुळ्या मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मागील साडेतीन वर्षांपासून भावेश व भाविका या जुळ्या मुलांची शस्त्रक्रिया करण्यास पालक असमर्थ होते. कॉक्लियर इम्प्लांट ही खर्चिक शस्त्रक्रिया असून या शस्त्रक्रियाला साधारण सहा ते आठ लाख रुपये खर्च येतो. ही महागडी सर्जरी करण्याकरीता आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पालक चिंतेत होते. दरम्यानच्या काळात पालकांनी चेंबूर येथील जुवेकर नर्सिंग होमचे कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. मिनेश जुवेकर यांच्याशी संपर्क साधला व मुलांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. मुलांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. पण पालकांकडे पैशांची चणचण असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले,ज्यामुळे डॉ. जुवेकर यांनी या जुळ्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यासाठी डॉक्टरांनी सेवाभावी संस्थेची मदत घेत या सेवाभावी संस्थेकडून शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे उपलब्ध करण्यात आली तर जुवेकर नर्सिंग होममध्येच दोन्ही मुलांवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
तब्बल दहा वर्षानंतर मुंबईत जुळ्या मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. मिनेश जुवेकर यांनी सागिंतले की, जन्मजात जुळ्या मुलांमधील बहिरेपणाचे प्रमाण जागतिक स्तरावर नगण्य असले तरीही ही बाब चिंताजनक आहे. मुंबईत जुळ्या मुलांची एकत्रितपणे शस्त्रक्रियेची नोंद दहा वर्षापूर्वी झाली होती. कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया महागडी असल्याने बहुतांशी पालक ही शस्त्रक्रिया करत नाही अथवा दुर्लक्ष करतात. पण एक वर्ष ते चार वर्षापर्यंत कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाचे ऐकण्याचे प्रमाण ९० टक्के असते. वाढत्या वयानंतर केलेल्या शस्त्रक्रियेत ऐकण्याची क्षमता फारच कमी असते.
महाराष्ट्र राज्यात आजघडीला साधारण ३९ हजार मुले बहिरेपणाची शिकार होत असतात. तसेच देशात जन्म घेणार्या एक हजार मुलांमध्ये दोन मुलांना ऐकू येत नाही. वेळेत उपचार व शस्त्रक्रिया न केल्याने तसेच महागडी सर्जरी असल्याने अनेक पालक याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे मुलांना बहिरेपणाचा सामना करावा लागतो.
-डॉ. मिनेश जुवेकर, कान नाक घसा तज्ज्ञ, जुवेकर नर्सिंग होम