मुंबई :
आरोग्य, शारीरिक शिक्षण त्याचप्रमाणे नागरी संरक्षण आणि रस्ता सुरक्षा यासंदर्भातील ज्ञान विद्यार्थी दशेपासूनच मुलांना व्हावे या उद्देशाने यंदापासून इयत्ता दहावीमध्ये दोन नवीन विषय सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आता नेहमीच्या विषयांबरोबरच ‘आरोग्य व शारीरिक शिक्षण’ आणि ‘नागरी संरक्षण व रस्ता सुरक्षा’ या दोन विषयांची भर दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पडणार आहे. या दोन्ही विषयांची पुस्तके बालभारतीकडून छापण्याची तयारी जोरदार सुरू असून, जूनपर्यंत ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणार असल्याचे बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य, शारीरिक शिक्षण, नागरी संरक्षण आणि रस्ता सुरक्षा यासंदर्भात ज्ञान मिळावे आणि त्यांच्या भावी आयुष्यात त्यांचा वापर करून सजग नागरिक व्हावे या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाकडून यंदापासून दहावीच्या अभ्यासक्रमांमध्ये ‘आरोग्य व शारीरिक शिक्षण’ आणि ‘नागरी संरक्षण व रस्ता सुरक्षा’ या दोन नव्या विषयांची भर टाकण्यात येत आहे. या विषयांचे गुण विद्यार्थ्यांना ग्रेड पद्धतीने देण्यात येणार आहेत. त्यामुळे या विषयांचे गुण हे गुणपत्रिकेत ग्रेड स्वरुपात दर्शवण्यात येणार असल्याने त्याचा अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे यापूर्वी विद्यार्थ्यांना असलेले चित्रकला, हस्तकला, शारीरिक शिक्षण या विषयांप्रमाणेच हे दोन विषय असणार आहेत. या दोन्ही विषयांच्या पुस्तके छपाईचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ही पुस्तके जूनपर्यंत शाळेमध्ये पोहचतील आणि शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना या दोन्ही विषयांची पुस्तके मिळतील अशी माहिती बालभारतीचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
दुसरीसाठी पुढील वर्षापासून द्विभाषिक पुस्तके
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी सृजनबालभारती भाग १ ते ४ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर पुढील वर्षापासून इयत्ता दुसरीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी सृजनबालभारती भाग १ ते ४ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.