मुंबई :
फ्लॅटमध्ये घुसलेल्या चारजणांच्या एका टोळीने घातक शस्त्रांचा धाक दाखवून मायलेकाला जिवे मारण्याची धमकी देऊन सुमारे २७ लाख रुपयांचा दरोडा घातल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच एका मुख्य आरोपीसह चौघांना खार पोलिसांनी अटक केली आहे.
रिझवान अहमद अन्सारी, सुनिल शंभुनाथ यादव, भारतकुमार भुरमल जैन आणि ऐयाज अहमद नियाज शेख अशी या चौघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत आहेत. यातील भारतकुमार हा तक्रारदाराचा काका असून घरातून बाहेर काढले म्हणून त्यानेच भावाच्या घरी दरोड्याचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मनन जैन हा १८ वर्षांचा तरुण कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत खार येथील ज्योती अपार्टमेंटमध्ये राहतो. दोन दिवसांपूर्वी दुपारी तो घरी टिव्ही बघत होता. यावेळी एक तरुण त्याच्या घरी आला. महत्त्वाचे दस्तावेज द्यायचे आहे सांगून त्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्याच्यापाठोपाठ इतर तीनजण त्याच्या घरी घुसले. यावेळी या चौघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून मनन आणि त्याच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. तुमच्या हत्येची सुपारी आपल्याला मिळाली असून जास्त बोलला तर जिवे मारण्याची धमकी देत त्यांनी त्यांच्याकडे कपाटातील चावी मागितली. त्यानंतर एक लाख रुपयांची रोकड, २६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल असा २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन ते चौघेही पळून गेले. पोलिसांत तक्रार केल्यास पुन्हा घरी येऊन दोघांची हत्या करु अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर त्यांनी खार पोलिसांना ही माहिती दिली. मननच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दरोड्यासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे व अन्य पोलीस पथकाने सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन रिझवान आणि सुनिलला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून भारतकुमार जैन आणि ऐयाज शेख याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या दोघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. तपासात मननचा भारतकुमार हा काका आहे. काही दिवसांपूर्वी त्याला सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. ही माहिती मिळताच मननच्या वडिलांनी त्याला घरातून काढून टाकले होते. त्यानंतर त्याने धारावी येथे एक सोन्याचे दुकान सुरु केले होते. मात्र या व्यवसायात त्याला नुकसान झाले होते. त्यामुळे त्याने दुकानात काम करणार्या कर्मचार्याच्या मदतीने उत्तर प्रदेशातून चौघांना मुंबईत बोलाविले होते. या तरुणांच्या मदतीने त्याने स्वतच्या भावाच्या घरी दरोड्याचा कट रचला होता. दरोड्यानंतर या चौघांना काही रक्कम तो देणार होता. या आरोपींकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, एक बाईक, सुरा आणि कटावणी आदी मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत असून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.