चेंबूर :
कोविडच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाले. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील सर्वच डॉक्टरांनी या काळात उत्तम कार्य केले. शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम केले गेले. आपण सर्वांना मिळून आयुर्वेदाच्या प्रसाराचे हे काम अविरत चालू ठेवायचे आहे, असे गौरवोद्गार आरोग्यधाम रुग्णालयाचे संचालक तसेच आयुष टास्क फोर्स सदस्य वैद्य उदय कुलकर्णी यांनी काढले.
आयुर्वेद क्षेत्रातील १२० वर्षांहून अधिकचा वारसा असलेली नामवंत कंपनी ‘साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयुर्वेद देवता भगवान श्री धन्वंतरी प्रकट दिन व राष्ट्रीय आयुर्वेद दिनी ‘वैद्य सत्कार समारोहा’चे आयोजन २ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता साण्डू फार्मास्युटिकलस् लिमिटेड, चेंबूर येथे केले. यावेळी वैद्य अजितकुमार साहू, वैद्य हर्षद भोसले, वैद्य मारुती कदम, वैद्य चंद्रमोहन शेट्टी, वैद्य नरेश पडवळ, वैद्य स्नेहल जगदाळे, वैद्य संदीप गौड आणि वैद्य सोनाली कवठेकर या तरुण व होतकरू डॉक्टरांचा सत्कार केला गेला. आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा, आयुर्वेद प्रचार व प्रसार करणार्या वैद्यांचा सत्कार याद्वारे केला जातो. या सत्कार समारंभाला राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य विनय वेलणकर आणि आरोग्यधाम रुग्णालयाचे संचालक तसेच आयुष टास्क फोर्स सदस्य वैद्य उदय कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वैद्यकशास्त्राची ही प्राचीन परंपरा जपण्याची संपूर्ण जबाबदारी इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे युवा वैद्यांवर आहे. आज या क्षेत्रातील युवा डॉक्टर हे अत्यंत महत्वाचे काम करत आहेत. आयुर्वेदाची कीर्तीपताका ते केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार फडकावत असल्याचे वैद्य विनय वेलणकर म्हणाले. आयुर्वेदाच्या प्रसारासाठी अनेक वैद्यराज आज कार्यरत असतात. कोरोना संकटाच्या दीड वर्षांच्या कठीण व आव्हानात्मक काळातही रुग्णसेवा देत रुग्णांना मार्गदर्शन करणाच्या कार्यात काही तरुण वैद्य हिरीरीने कार्यरत होते. अशा वैद्यराजांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणे हा हेतू या सत्कार सोहळ्यामागे होता. साण्डू फार्मास्युटिकल्सने आयुर्वेदाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी अनेक पुरस्कारांचे वितरण वेळोवेळी केले जाते. गेल्यावर्षी कोरोनाच्या कालावधीत काहीशा मागे पडलेल्या या उपक्रमाला आम्ही पुन्हा सुरुवात करत आहोत, असे उद्गार ‘साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड’चे संचालक श्री शशांक साण्डू यांनी काढले.
सत्कारमूर्ती वैद्यांचे उल्लेखनीय कार्य
- ‘कायचिकित्सा’ विषयात एमडी पदवी मिळविलेले आणि आयुर्वेदाचार्य परीक्षेत सुवर्णपदक पटकावलेले वैद्य अजितकुमार साहू यांनी परदेशांमध्ये आयुर्वेद विषयांवरील परिषदांमध्ये २० पेक्षा जास्त शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांपैकी ५ शोधनिबंध विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
- ‘द्रव्यगुण’ विषयात एमडी असलेले वैद्य हर्षद भोसले हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा व सेमिनारमध्ये सहभागी झाली आहेत.
- ‘मधुमेह व अस्थीक्षय’ या विषयांमध्ये संशोधन करत असलेले वैद्य मारुती कदम हे कायचिकित्सा या विषयात एमडी आहेत. ‘युरोपियन जर्नल ऑफ फार्मास्युटीकल अँड मेडिकल रिसर्च’ यांसारख्या मासिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
- वैद्य चंद्रमोहन शेट्टी यांनी ‘स्वस्थवृत्त व योग’ या विषयांत एमडी पदवी मिळविली असून त्यांना नुकतेच आयुर्वेद दूत व कोविड योद्धा हे पुरस्कार नामवंत संस्थांतर्फे देण्यात आले आहेत.
- वैद्य नरेश पडवळ यांनी ‘कायचिकित्सा’ विषयात एमडी पदवी मिळविली असून देश आणि विदेशांमध्ये २० पेक्षाही अधिक संमेलनांमध्ये सहभाग नोंदविला आहे.
- वैद्य स्नेहल जगदाळे या आयुर्वेदाचार्य आहेत आणि त्यांनी ‘पंचकर्म, सूक्ष्मऔषधी, सत्त्वावजय मानस चिकित्सा’ आदी विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे.
- ‘द्रव्यगुण’ विषयात एमडी असलेले वैद्य संदीप गौड हे ‘असोसिशन ऑफ आयुर्वेद प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिका’चे सदस्य आहेत.
- वैद्य सोनाली कवठेकर यांनी आयुर्वेदाचार्य पदवीबरोबरच ‘पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कॉस्मिटोलॉजी अँड लेझर, ट्रीचोलॉजी’ केला आहे. या सर्वच आठ वैद्यराजांनी कोविडच्या काळात अतुलनीय अशी कामगिरी केली आहे.