Voice of Eastern

मुंबई :

जवाहरलाल नेहरू ग्रंथालयामध्ये पुस्तकांची होत असलेली दुरवस्था आणि नवीन ग्रंथालयामध्ये पुस्तके हलवण्यास विद्यापीठाकडून दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी वारंवार लक्ष वेधूनही नवीन ग्रंथालयाची इमारत सुरू करण्याबाबत मुंबई विद्यापीठाकडून ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे.

नवीन ग्रंथालयाची इमारत

मागील चार वर्षांपासून जवाहरलाल नेहरू ग्रंथालय व नवीन इमारत याबाबत अधिसभा व पत्रव्यवहारांच्या माध्यमातून युवासेने सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी वारंवार लक्ष वेधले. परंतु आपण प्रत्येकवेळी आश्वासनांव्यतिरिक्त काहीच देण्यात आली नाही. मात्र प्रसारमाध्यमातून हा विषय अधोरेखित झाल्याने थेट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी या विषयाची दखल घेत जवाहरलाल नेहरू ग्रंथालय व नवीन ग्रंथालयाच्या इमारतीबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी अग्निशमन दल, महापालिका, एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेतली. मात्र या तिन्ही बैठकांना कुलगुरू अनुपस्थित होते. पहिल्या बैठकीमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून १५ मार्च २०२२ पर्यंत नवीन ग्रंथालय सुरू करण्याची तारीख देण्यात आली होती. मात्र या मुदतीमध्येही ग्रंथालय सुरू न झाल्याने पुन्हा घेतलेल्या बैठकीमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून ३१ मे २०२२ ही मुदत दिली. मात्र ही मुदतही उलटून गेली तरी विद्यापीठाकडून नवीन ग्रंथालय सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. त्यामुळे सिनेट सदस्यांप्रमाणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनाही तारीख पे तारीख देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

२०१६ मध्ये सुरू झालेले जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या दुरुस्तीचे काम २०२२ मध्येही सुरूच आहे. या कालावधीत मुंबई विद्यापीठाचे तीन कुलगुरू आणि पाच कुलसचिव झाले. सध्याच्या कुलगुरूंचाही कार्यकाल पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. दुरुस्ती केलेल्या भागातही काही ठिकाणी छताला टेकू लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. डेब्रिजची विल्हेवाट लावणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असते. मात्र ग्रंथालयाच्या दुरुस्तीचे काम करणार्‍या कंत्राटदाराने डेब्रिज इमारतीच्या आजुबाजूलाच टाकले आहे. त्यामुळे ग्रंथालयाच्या तळमजल्याच्या खिडक्यांपर्यंत डेब्रिजचा थर जमलेला आहे. त्यामुळे ग्रंथालयाची नवीन इमारत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही थोरात यांनी केली.

Related posts

शिंदे समर्थकांकडून मुंबई विद्यापीठाचे पावित्र्य भंग; केला हा लाच्छंनास्पद प्रकार

दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो..! – मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

‘महास्वयंम’द्वारे डिसेंबरमध्ये ४५ हजार बेरोजगारांना नोकरी

Voice of Eastern

Leave a Comment