Voice of Eastern

मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मोकळी जागा चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी भाड्याने दिल्यानंतर आता विद्यापीठाने त्यांचे हेलिपॅडही भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीकेसीमध्ये एका बैठकीसाठी येणार्‍या उद्योजकाला त्याचे हेलिकॉप्टर कलिना संकुलातील हेलिपॅडवर उतरवण्यासाठी विद्यापीठाने परवानगी दिली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाला अधिसभा सदस्यांकडून विरोध करण्यात आला असून, विद्यापीठाची जागा ही शैक्षणिक वापरासाठी आहे की व्यावसायिक वापरासाठी असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात वांद्रे कुर्ला संकुलाच्या दिशेला हेलिपॅड उभारण्यात आले आहे. हे हेलिपॅड राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी मागणी केल्यानंतर तसेच विद्यापीठाच्या वापरासाठी उपलब्ध केले जाते. मात्र याचा व्यावसायिक वापर सुरू करावा या उद्देशाने काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची सूचना केली होती. जेणेकरून विद्यापीठाना उत्पन्नही मिळेल आणि त्या जागेचा वापरही होईल. यानुसार विद्यापीठाकडे ठाण्यातील एका कंपनीच्या मालकाने येत्या ५ डिसेंबर रोजी हेलिपॅड उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा केली. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय होऊन या कंपनीला हेलिपॅड वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. यासाठी विद्यापीठातर्फे लॅण्डिंग आणि टेकऑफसाठी ३० हजार रुपये तसेच पार्किंगसाठी तासाला पाच हजार रुपये आणि २५ हजार रुपये अनामत रक्कम अशा प्रकारे दर आकारण्यात आले आहे. मात्र काही अधिसभा सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठाने नुकतीच एका चित्रिकरण कंपनीला त्यांची जागा भाड्याने वापरण्यासाठी दिली आहे. आता हेलिपॅडही व्यावसायिक वापरासाठी खुले करण्यात आले आहे म्हणजे विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक उपयोग करण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे का असा प्रश्न अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल हे विद्यापीठाच्या कलिना संकुलापासून जवळ आहे आज आपण एका कंपनीच्या हेलिकॉप्टरच्या टेक ऑफ आणि लॅण्डिंगसाठी परवानगी दिली तर भविष्यात अशा अनेक कंपन्यांकडून मागणी होईल आणि ती मागणी विद्यापीठ पुरविणार आहे का? असा प्रश्नही तांबोळी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, याबाबत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला असून त्यानुसार हेलिपॅड वापरण्यासाठी देण्यात आले आहे. यापूर्वीही अशा प्रकारे हेलिपॅड भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

Related posts

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त

टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा उसळला महासागर

नोव्हेंबरमध्ये वीज बिल न भरणाऱ्या ६,४७४ ग्राहकांचा महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

Voice of Eastern

Leave a Comment