Voice of Eastern

मुंबई : 

अपुरे पूर्णवेळ प्राध्यापक, मर्यादित वर्गखोल्या, ऑनलाईन लायब्ररीचा अभाव यामुळे मागील पाच वर्षामध्ये मुंबई विद्यापीठातील एलएलएम अभ्यासक्रमाचा विस्तार होण्याऐवजी तो अधिकच खुंटला आहे. मुंबई विद्यापीठाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे फक्त फोर्ट व रत्नागिरी कॅम्पसपुरताच मर्यादित राहिला आहे. याउलट विद्यापीठाशी संलग्न जवळपास १७ खासगी महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या खासगी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे खासगी महाविद्यालयांचे उखळ पांढरे व्हावे यासाठीच विद्यापीठाकडून या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

एलएलबी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचा एलएलएम करण्याकडे कल असतो. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस व रत्नागिरी कॅम्पसमध्ये एलएलएमचा अभ्यासक्रम पाच वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. विद्यापीठामध्ये फोर्ट कॅम्पसमध्ये एलएलएमच्या ६०० जागा आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चार हजार व मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना ३५० रुपये शुल्कामध्ये शिकवला जातो. त्यामुळे विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याला विद्यार्थ्यांची पसंती असते. मात्र एलएलएमच्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याकडे विद्यापीठाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. यूजीसीच्या नियमानुसार २५ विद्यार्थ्यांसाठी एक पूर्णवेळ प्राध्यापक असणे आवश्यक आहे. मात्र मुंबई विद्यापीठामध्ये एलएलएमच्या ६०० विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचच पूर्णवेळ प्राध्यापक आहेत. ही कसर भरून काढण्यासाठी विद्यापीठाकडून ३० ते ३५ व्याख्याते तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्त केले आहेत. मात्र त्यांना प्रति ५० मिनिटे फक्त ३०० रुपये इतके मानधन दिले जाते. अन्य महाविद्यालयांमध्ये हेच मानधन प्रति तास हजार रुपये दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल उशिराने लागणे, गुणवत्तेवर परिणाम होणे यासारख्या घटना घडतात. त्याचप्रमाणे निकालाचे काम कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या व्यक्तीकडून केले जाते. कायमस्वरुपी व्यक्ती नसल्याने चुका टाळण्यावर नियंत्रण मिळवणे तसेच कारवाईही करता येत नाही. अपुर्‍या प्राध्यापक संख्येबरोबरच फोर्ट कॅम्पसमधील ६०० विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने अवघ्या ७ ते ८ वर्ग खोल्या दिल्या आहेत. याच वर्ग खोल्यांमध्ये विधी विभागाच्या डिप्लोमा कोर्सच्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त भारही टाकला आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठात झालेल्या नॅकच्या पाहणीवेळी या खोल्यांमध्ये कपाटे व अन्य सामान ठेवले आहे. त्यामुळे सध्या एलएलएमच्या विद्यार्थ्यांसाठी एकही वर्गखोली फोर्ट कॅम्पसमध्ये उपलब्ध नाही.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट व रत्नागिरी कॅम्पसमध्ये एलएलएमचा अभ्यासक्रम राबवण्यात येतो. मात्र विद्यापीठाच्या दुर्लक्षामुळे या अभ्यासक्रमाचा विस्तार कलिना, ठाणे, कल्याण व इतर कॅम्पसमध्ये झाला नाही. याउलट अन्य १७ खासगी महाविद्यालये सुरू झाली. विद्यापीठामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चार हजार व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३५० रुपयांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो. मात्र खासगी महाविद्यालयांकडून ५० ते ७० हजार रुपये शुल्काच्या स्वरुपात वसूल केले जातात. यावरून नवीन खासगी महाविद्यालये सुरू व्हावीत व त्यांना विद्यार्थ्यांची लूट करता यावी, यासाठीच विद्यापीठ एलएलएमच्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना कमी शुल्कात चांगले शिक्षण मिळवण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन एलएलएमच्या विद्यापीठातील जागा वाढवाव्यात. सर्व कॅम्पसमध्ये एलएलएमचे वर्ग सुरू करावेत. यूजीसीच्या नियमानुसार पूर्णवेळ प्राध्यापक नियुक्त करावेत. न्यायालयाच्या निकालांचे संदर्भ अभ्यासण्यासाठी ऑनलाईन लायब्ररी त्वरित सुरू करावी.
– अ‍ॅड. वैभव थोरात, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

Related posts

बेस्ट बसला गणपती बाप्पा पावले

Voice of Eastern

सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्यूच्या आळ्या, पालिकेची कार्यवाही

यंदापासून पहिली ते १२ वी साठी पुन्हा १०० टक्के पाठ्यक्रम लागू

Voice of Eastern

Leave a Comment