मुंबई :
देशभरामध्ये १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १६ मार्चपासून सुरूवात झाली. मात्र मुंबईमध्ये पहिल्याच दिवशी दीड ते दोन तासांने लसीकरण विलंबाने सुरू झाले. विलंबाने सुरुवात झाल्याने केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना ताटकळावे लागले.
१२ वर्ष पूर्ण ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणा १६ मार्चपासून सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आपल्या मुलांचे लसीकरण करण्यासाठी मुंबईतील अनेक पालकांनी १२ लसीकरण केंद्रांवर सकाळीच ११.३० वाजल्यापासून गर्दी केली होती. मात्र कोविन अॅपवर स्लॉट मिळत नसल्याने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाल्याशिवाय लसीकरण सुरु करू नका असा संदेश पाठवण्यात आला. लहान मुलांना लसीकरण कसे करावे याच्या सूचना आरोग्य कर्मचार्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिल्या जाणार होत्या. दुपारी २ वाजता ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपल्यामुळे मुलांना व त्याच्या पालकांना लसीकरणासाठी केंद्रावर ताटकळत राहावे लागले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर राजावाडी रुग्णालय व अन्य काही केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली, मात्र बीकेसी कोविड सेंटरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची वाट न बघताच लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे १२ ते १४ वयोगटातील मुलांचे पहिल्याच दिवशी लसीकरण गोंधळात सुरु झाल्याचे चित्र होते.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना आजारासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. या मोहिमेत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षांवरील वयोवृद्ध, ४५ वर्षांवरील आजार असलेले नागरिक त्यानंतर १ मे, २०२१ पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे आणि ३ जानेवारी २०२२ पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आता १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे १२ केंद्रांवर कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारकडून लसीकरणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे येण्यास विलंब झाल्याने लसीकरणाला साधारण दीड ते दोन तास विलंब झाला. लसीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर तातडीने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
– डॉ. नीलम अंद्राडे, संचालक, मुंबई महापालिका रुग्णालये