मुंबई :
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १६ मार्च २०२२ पासून १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील १२ केंद्रांवर २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी १२ वाजल्यापासून हे लसीकरण सुरु होणार आहे. या केंद्राचा अभ्यास, अडचणी आणि प्रतिसाद पाहून आरोग्य सुविधांसह इतर बाबींचा विचार करुन त्यानंतर सर्व केंद्रांवर १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबईमध्ये १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ साठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. या लसीकरण मोहीमेत प्रथम प्राधान्य गट, त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील नागरिकांचे आणि ३ जानेवारी २०२२ पासून १५ वर्षे वयावरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली. आता १६ मार्चपासून १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी पालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचे सहकार्य घेतले जाणार आहे.
१ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० पूर्वी जन्मललेले मुले लसीकरणासाठी पात्र असतील. या मुलांना Corbevax ही लस हातावर देण्यात येणार आहे. या लसीच्या दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर असणार आहे.कोविन प्रणालीत आवश्यक बदल झाल्यानंतर पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
लसीकरण केंद्रांची यादी
- ई विभाग – नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल
- ई विभाग – जे.जे. रुग्णालय, भायखळा
- एफ उत्तर विभाग – सायन रुग्णालय, शीव (पूर्व)
- एफ दक्षिण – केईएम रुग्णालय, परळ
- एच पूर्व – बीकेसी कोविड केंद्र, वांद्रे (पूर्व)
- के पूर्व – सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व),
- के पश्चिम – कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)
- पी दक्षिण – नेस्को कोविड केंद्र, गोरेगाव (पूर्व),
- आर दक्षिण – शताब्दी रुग्णालय, कांदिवली (पश्चिम),
- एन विभाग – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व).
- एम पूर्व विभाग – शताब्दी रुग्णालय, गोवंडी
- टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड