मुंबई :
युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले. मात्र वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये तरुणाईला कोरोनापासून वाचवण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या शिबिरामध्ये १५ ते १८ वयोगटातील १२६ तरुणांचे लसीकरण करण्यात आले.
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पर्यटनमंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना वरळी विधानसभा यांच्या वतीने १५ ते १८ वयोगटातील १२६ युवक-युवतींना बसेसद्वारा बीकेसी व एनएससीआय डोम केंद्रावर नेऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक दत्ता नरवणकर, युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांच्या शुभहस्ते लसीकरण करण्यासाठी जाणाऱ्या बसेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या लसीकरणाच्या आयोजन युवा विभागअधिकारी संकेत सावंत आणि युवती विभागअधिकारी आकर्षिका पाटील यांनी केले होते. युवा सेनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेत मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला तसेच विभागातील १५ ते १८ वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण करण्यासाठी युवा सेनेने पुढाकार घ्यावा असे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले