नवी दिल्ली :
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खाजगी वाहनांसाठी आंतर- देशीय प्रवासासाठी नियमावलीचा मसुदा १६ मार्च रोजी जारी केला. अन्य देशांमध्ये नोंदणी केलेली अव्यवसायिक किंवा खाजगी वाहनांना भारतात प्रवेश करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी नियम लागू केले आहेत.
इतर कुठल्याही देशात नोंदणी झालेली वाहने भारतात माणसांच्या वाहतुकीसाठी किंवा मालाची ने-आण करण्यासाठी वापरता येणार नाहीत. कोणत्याही देशात नोंदणी झालेल्या वाहनाला भारताच्या मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम ११८ मधील नियम आणि अटी पाळणे बंधनकारक असणार आहे.
आंतरदेशीय वापरासाठीच्या अव्यावसायिक म्हणजेच खाजगी वाहनांना लागू असणाऱ्या नियमावलीनुसार भारतात असताना या वाहनांसोबत काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. ही कागदपत्रे इंग्लिशऐवजी इतर भाषेत असतील तर इंग्लिश भाषेतील प्रत योग्य अधिकारी व्यक्तींकडून अक्षरांकित करून ती मूळ कागदपत्रांबरोबरच ठेवावी लागणार आहेत
आवश्यक कागदपत्रांची यादी
- वैध नोंदणी प्रमाणपत्र
- वैध चालक परवाना किंवा आंतरराष्ट्रीय चालक परवाना यापैकी जे लागू असेल ते
- वैध विमा पॉलिसी
- वाहन ज्या देशातले आहे, त्या देशात लागू असल्यास योग्य- वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी)