मुंबई :
भारतातील विविध शहरातून चोरी होणारे मोबाईलची बांगलादेशात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोवंडीतील शिवाजीनगर येथे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीमेतर्गत कारवाई करुन लाखो रुपयांचे चोरीचे मोबाईलचा जप्त केले.
गोवंडीतील शिवाजीनगर येथील एक टोळी मुंबईसह भारतातील विविध शहरातून चोरी होणारे मोबाईल विकत घेऊन ते पॅकिंग करुन बांगलादेशात पाठवित होती. या टोळीकडे लाखो रुपयांचे चोरीचे मोबाईल असून मोबाईलचा हा साठा लवकरच बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी शिवाजीनगर, प्लॉट क्रामंक ३९ मधील एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. मात्र पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळताच फ्लॅटमधील आरोपी तिसर्या मजल्यावरील बाजूच्या टेरेसवरुन पळून गेले. पोलिसांनी हा फ्लॅट सील करून कारवाई केली असता १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे ४३ लाख रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे २४८ मोबाईल, दोन लॅपटॉप, मोबाईल फोन बॅग कव्हर, इर्टिंगा कार आणि इतर साहित्य असा सुमारे ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याच गुन्ह्यांत मोहम्मद समीर अहमद मोहम्मद रफिक शेख, वाजिद शेख, सोनूसह इतर आरोपीविरुद्ध ३७९, ४११, ४१३, १२० ब भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्ह्यांत तीन आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.