मुंबई :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व विश्व अहिंसा दिनाचे औचित्य साधून समाजात अहिंसा आणि विश्व बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी व मूल्याधिष्टित जीवन प्रणालीचे महत्व पटवून देण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे २ ऑक्टोबरला सायंकाळी ४.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे भजनसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमाचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, कुलसचिव सुधीर पुराणिक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे, प्रा. कविता लघाटे, पर्ड्यू विद्यापीठ इंडियाना, अमेरिकाचे विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. जॉन व संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. राजीव राजे आणि कवी संकेत म्हात्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सर्वधर्म समभावाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी मान्यवर गायकांनी त्यांच्या सुमधूर स्वरांनी भजने सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सर्वधर्म प्रार्थना, वैष्णव जण तो, हीच अमुचि प्रार्थना, खरा तो एकचि धर्म, अल्ला तेरो नाम, बाजे मुरलिया बाजे, ऐ मेरे वतन के लोगो, मजहब मेरा है तिरंगा, अबीर गुलाब आणि कानडा राजा अशी अनेक गीते सादर करण्यात आली. विश्व अहिंसा दिनाच्या निमित्ताने प्र. कुलगुरू प्राचार्य डॅा. अजय भामरे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठ, सलंग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळपास ३ हजार विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, संगीत विभाग, आजीवन अध्ययन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एनसीसी या सर्व विभागाच्या सयुंक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.