Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई विद्यापीठात कुलगुरूंची गाजराची शेती : सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांचा आरोप

banner

मुंबई :

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक यांच्याबरोबरच विद्यापीठातील संलग्न महाविद्यालये यांचे प्रश्न, समस्या सोडवून पारदर्शी कारभार आणि विद्यापीठाचा लौकीक वाढावा यासाठी सिनेट सदस्यांकडून कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व विद्यापीठ प्रशासनाकडे पत्रव्यवहार करतात. मागील चार वर्षांमध्ये सिनेट सदस्यांकडून किमान ५०० पेक्षा अधिक पत्र व निवेदने देऊनही कुलगुरूंकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. पत्रावर उत्तर मिळावे यासाठी सिनेट सदस्यांकडून वारंवार आंदोलने केल्यावर कुलगुरूंकडून फक्त आश्वासनांचे गाजर देण्यात येत असल्यामुळे कुलगुरूंनी मुंबई विद्यापीठात गाजराची शेती केली असल्याचा आरोप युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केला.

मुंबई विद्यापीठाचा लौकीक वाढावा यासाठी प्रशासनाचा कारभार पारदर्शी होऊन विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्‍यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी सिनेट सदस्य आग्रही असतात. त्यानुसार विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक, महाविद्यालये यांना येणार्‍या समस्या सोडवण्यासाठी ते कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व विद्यापीठ प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत असतात. पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सिनेट सदस्यांना कुलगुरूंशी संपर्क साधणे शक्य होत असते. २०१८ रोजी अस्तित्त्वात आलेल्या अधिसभेतील सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी १०० निवेदने तर सर्व सदस्यांची मिळून किमान ५०० पेक्षा अधिक निवेदने कुलगुरूंच्या नावाने दिली आहेत. मात्र विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांच्या समस्या सोडवण्याबाबत तसेच विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्याबाबत उदासिन असलेल्या कुलगुरूंनी आतापर्यंत एकाही पत्राला प्रतिसाद दिलेला नाही. पत्रांना उत्तरे मिळावीत यासाठी सिनेट सदस्यांनी ७ डिसेंबर २०१८ रोजी कुलगुरूंच्या दालनात आंदोलन केल्यानंतर त्यांच्या पत्रांना उत्तरे देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र कुलगुरूंच्या दालनातून सिनेट सदस्य बाहेर येईपर्यंत ते आश्वासन हवेतच विरले. त्यानंतर अनेकवेळा सिनेट सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित करूनही कुलगुरूंकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असल्याने त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात. त्यामुळे ते पत्रव्यवहार करत असतात. सिनेट सदस्यांना वेळ जात नाही अथवा सिनेट सदस्यांकडे स्टेशनरी जास्त झालेली असेल म्हणून सिनेट सदस्य पत्रव्यवहार करतात असेही नाही. आतापर्यंत कुलगुरू व प्रशासन हे विद्यार्थ्यांना नेहमीच गृहीत धरत आले आहे, आता सिनेट सदस्यांनाही गृहीत धरत असल्याची टीका मुंबई विद्यापीठातील युवासेनेचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी सांगितले.

कुलगुरूंनी केली गाजराची शेती

कुलगुरूंना पत्राला उत्तरे द्यावी, यासाठी सिनेट सदस्यांनी मागील चार वर्षांमध्ये अनेकदा अधिसभेत गदारोळ घातला. कुलगुरूंच्या दालनातही आंदोलन केले. मात्र कुलगुरूंकडून दरवेळी आश्वासनांचे गाजर दिले आहे. मागील ४ वर्षात पत्रांबाबत कुलगुरूंकडून आश्वासनांची इतकी गाजरे देण्यात आली आहेत की, त्यांनी कालिना कॅम्पसमध्ये गाजरांची शेती केली आहे का? असा प्रश्न पडू लागला असल्याची टीका सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केली.

‘कुलगुरूंचं पत्र हरवलं, कोणालाच सापडत नाही’

लहानपणी आम्ही ‘मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं.’ तसाच खेळ आता कुलगुरू सिनेट सदस्यांसोबत खेळत आहात. ‘कुलगुरूंच पत्र हरवलं पण ते कोणालाच सापडत नाही.’ अशी टीका अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये आम्ही दिलेल्या पत्रांवर कुलगुरूंकडून आम्ही उत्तर दिले, असे सांगितले जाऊ शकते. पण ते अद्याप कोणालाच मिळाले नसल्याचेही थोरात यांनी सांगितले.

कुलगुरू आता तुम्हीच सांगा कोणावर कारवाई करायची

७ व ८ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या अधिसभेमध्ये कुलगुरूंना १५ दिवसांत पत्रांना उत्तर दिली जातील, अन्यथा संबधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सहा महिने उलटले तरी ना पत्रांना उत्तरे, ना कोणावर कारवाई झाली. पत्रांना उत्तरे देण्याबाबत कुलगुरूच निरुत्साही असल्याने आता त्यांच्यावरच कारवाई करण्याची वेळ आली असल्याचे टीकास्त्र वैभव थोरात यांनी आपल्या पत्रातून केले आहे.

Related posts

कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिका परिसेवकांचे आंदोलन

उपनगरात महापालिका बसवणार ७५ डायलिसिस मशीन 

Voice of Eastern

यु-डायस प्लसमध्ये अवघ्या ५६ टक्के शाळांची नोंदणी

Leave a Comment