Voice of Eastern

मुंबई : 

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विविध ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवण्यात येत आहेत. २०२०-२१ मध्ये महाराष्ट्रात ३० ते ४० तरुणांचा क्रिकेटच्या मैदानावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तरुणांनी क्रिकेट खेळताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत.

सध्या मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये १८ ते ५० वयोगटातील नागरिकांचा सहभाग असतो. मैदानात खेळताना शरीरातील पाणी कमी होऊन चक्कर येणे, पडल्यामुळे दुखापत होणे, रक्तदाब वाढल्यामुळे चक्कर येणे असे प्रकार घडतात. अशावेळी तात्काळ उपचार करणे फार गरजेचे असते. मात्र अनेकवेळा चक्कर आलेल्या खेळाडूला सावलीत किंवा तंबूमध्ये बसवले जाते. असे करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

सध्या तिशीमधील तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहेत. यामध्ये मुखत्वे खाण्याच्या व झोपण्याच्या वेळेत झालेला कमालीचा बदल शारीरिक व मानसिक ताणतणाव वाढीस कारणीभूत ठरतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह व उच्च रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे. मैदानात खेळ सुरु असताना तेथील स्पर्धेच्या वातावरणामुळे रक्तदाब वाढतो. त्या खेळाडूचे हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात अशावेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे असते, असे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अविनाश गुठे यांनी सागिंतले.

रोज सात तासांपेक्षा कमी अथवा जास्त झोपेचा थेट संबंध हृदयाशी येतो. जे तरुण रोज सात तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांचे हृदय वृद्धत्वाकडे जात असल्याचे अमेरिकेतील जॉर्जियामधील ‘इमोरी युनिव्हर्सिटी’तील संशोधनात दिसून आले आहे. मानसिक तणाव, बिघडलेली आर्थिक गणिते, नात्यांमधील दुरावा व सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुण पिढी पाहता भविष्यात हृदयविकार वाढण्याची शक्यता असून रोजच्या जीवनशैलीमध्ये तत्काळ बदल करणे गरजेचे आहे असे मत हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अविनाश गुठे यांनी व्यक्त केले आहे.

Related posts

होमिओपॅथीसह गोवरविरोधात लढा; मॉर्बिलीनम २०० ठरते प्रभावी

महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १६ जानेवारीला

Voice of Eastern

Leave a Comment