Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

कचरा उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच होणार ओला-सुका कचरा वर्गीकरण

banner

मुंबई :

मुंबई महानगरात कचरा उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच ओला-सुका कचरा वर्गीकरणात नागरी सहभाग वाढवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर मुख्यत्वेकरून रहिवासी संस्थांच्या परिसरात कचरा वर्गीकरणाबाबत माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.

मुंबईत निर्माण होणाऱया कचऱ्याचे वर्गीकरण हे उत्पत्ती स्त्रोताच्या ठिकाणीच व्हावे, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील रहिवासी संस्थांच्या माध्यमातून १ हजार टन इतका जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे, हे घनकचरा व्यवस्थापन विभागासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळेच कचऱ्याच्या उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच वर्गीकरण करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले. या पुढाकाराचा भाग म्हणून माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृतीसाठी संस्थांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवणे यासाठीच थेट संवादाची अधिक गरज आहे. म्हणूनच दैनंदिन कचरा संकलन करण्याच्या प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी हा संवाद घडणे गरजेचे आहे. त्यामुळे ओला कचरा स्वतंत्र्यरित्या संकलित करणे शक्य होईल. मुंबईतील कचऱयाचे उत्पत्तीस्थान हे घरगुती तसेच रहिवासी संकुलातून देखील आहे. म्हणूनच माहिती, संवाद आणि शिक्षण अभियानातून तसेच लोकसहभागातून हा बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत कचऱ्याच्या उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत माहिती, शिक्षण आणि संवाद आराखडा निश्चित करणे अपेक्षित आहे.

महानगर गॅस बनविणार कचऱ्यापासून बायोगॅस

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यामध्ये १ हजार टन क्षमतेच्या ओला कचऱ्यापासूनच्या बायोगॅस निर्मिती प्रकल्पासाठीचा करार झाला आहे. त्या दिशेने ओला कचरा संकलित करण्यासाठीचा मार्ग आखण्यात आला असून विशेष वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ओला कचरा संकलनामध्ये वर्गीकरणाचा मोठा अडथळा आहे. यावर जागृती म्हणून कचरा उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जनजागृतीसाठी भित्तीचित्रांचाही वापर

मुंबईतील नागरिकांमध्ये विविध संदेशांच्या भित्तिचित्रांद्वारे आणि उड्डाणपूल, सार्वजनिक ठिकाणे इत्यादींवर सुशोभीकरणाद्वारे जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. त्यात चित्रे, भित्तिचित्रं इत्यादी प्रकार समाविष्ट असतील. स्वच्छता, कचरा विलगीकरण आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व या माध्यमातून पटवून देण्यात येणार आहे.

Related posts

कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – अदिती तटकरे

दीपावलीसाठी ठाणे विभागातून धावणार दररोज जादा ४९ गाड्या

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना पोलिसांनी दिले सुरक्षेचे धडे

Voice of Eastern

Leave a Comment