Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

पोस्ट कोविड आजारावरील संशोधनावर भर देणार -पालिका रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे

banner

मुंबई :

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या रुग्णांना होत असलेला त्रास आणि कोरोनामुळे शरीरातील विविध संस्थांवर झालेला परिणाम यावर संशोधन होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात कोरोनाची आणखी लाट आल्यास तिचा सामना करण्यासाठी ‘पोस्ट कोविड’ रुग्णांवर संशोधन करण्यास चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिका रुग्णालयाच्या संचालिका व नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

कोरोनाची पहिली लाट आली, त्यावेळी कोरोना आपल्यासाठी नवीन असल्याने त्याचा सामना करण्यात अनेक अडचणी आल्या. मात्र आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना केल्याने कोरोनाचा सामना करणे शक्य झाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर त्यावर झालेल्या संशोधनामुळे आपल्याला दुसर्‍या व तिसर्‍या लाटेचा सामना करणे सोपे गेले. परंतु कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना त्यानंतर अनेक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. नेस्कोमध्ये आम्ही केलेल्या संशोधनामध्ये पोस्ट कोविड ओपीडीमध्ये कोरोनामधून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये रेट्रो स्टेर्नलची समस्या उद्भवल्याचे दिसून आले. यामध्ये रुग्णांच्या छाती, फुफ्फुस आणि पाठीच्या मणक्याच्या वेदना होत असल्याचे आढळून आले. यावर आम्ही अभ्यास केला असता हा त्रास कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांना स्नायूंचा अशक्तपणा, फुफ्फुसाचा त्रास, म्युकर मायकोसिस यासारख्या अनेक समस्यांचा रुग्णांना सामाना करावा लागत होता. त्यामुळे फुफ्फुस, मेंदू आणि स्नायू यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी त्यातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या आरोग्य विषयक समस्यांचा सामना करणे हे आपल्यासमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे. त्यासाठी या रुग्णांच्या समस्यांवर सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. ही ओपीडी साधारणपणे पुढील सहा महिने चालवण्याचा विचार आहे. ही पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यासाठी रुग्णालयांचे अधिष्ठाता, चेस्ट मेडिसिन विभागाचे प्रमुख यांच्याशी लवकरच चर्चा करून पोस्ट कोविड ओपीडीसाठी निश्चित वेळ आणि दिवस ठरवण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिका रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.

Related posts

गणेशोत्सव कालावधीत ‘स्टिंग रे’, ‘जेलीफीश’पासून रहा सावध – मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी

अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला राष्ट्रीय रग्बी स्पर्धेवर मुंबई विद्यापीठाचे वर्चस्व

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले

Voice of Eastern

Leave a Comment