मुंबई :
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या २६ व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतील १२ संघटनांनी वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात व विविध मागण्यांसाठी २८ व २९ मार्च २०२२ रोजी संप करण्याचा इशारा दिला. या संपात मोठ्या संख्येने वीज कंपन्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन दिवस राज्यातील विविध ठिकाणचा वीज पुरवठा खंडित होऊन महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे. मात्र ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून कंबर कसरण्यात आली आहे.
२८ व २९ मार्च २०२२ रोजी वीज कर्मचार्यांच्या होणार्या संपावेळी अधिकारी, कर्मचारी, लाईन स्टाफ व बाह्यस्त्रोत कर्मचार्यांचा कमतरता निर्माण होणार आहे. त्यामुळे या कालावधीत वीज वितरण पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी तिन्ही मंडळातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर अधिकार्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत मनुष्यबळ तसेच इतर आवश्यक साहित्याचे नियोजन करून संप काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक मंडळातील एजन्सीशी संपर्क साधून अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्थाही केली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वितरण रोहित्र, विद्युत तारा तसेच प्रत्येक उपविभागात गाड्यांची व्यवस्था केली आहे. भांडुप परिमंडळात तसेच तिन्ही मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. परिमंडलाच्या नियंत्रण कक्षातून स्वतः मुख्य अभियंता सुरेश गणेशकर सर्व परिस्थितींवर लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे ग्राहकांवर या संपाचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून सर्व तयारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तिन्ही मंडळाचे डीएसएस कंट्रोल रूम (ठाणे – ९९३०२६९३९८, वाशी -८८७९९३५५०१, पेण-७८७५७६५५१०) चालू असणार आहे. ग्राहकांनी विजेबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क साधावा. तरीही, एखाद्या ठिकाणी जर काही कारणास्तव कुणाचाही वीजपुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत करण्यासाठी वेळ लागला तर ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व वीज ग्राहकांना केले आहे.