मुंबई :
युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती जमा करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रम आणि त्यांना भारतीय विद्यापीठांमध्ये सामावून घेण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे, असे सांगत वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
युक्रेनमधील ३३ विद्यापीठांमध्ये १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये दोन हजार विद्यार्थी हे केवळ महाराष्ट्राचे आहेत. आपल्या देशात वैद्यकिय शिक्षणासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा घेतली जाते, मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये अशी परीक्षा न घेताच प्रवेश दिला जातो. भारतातील शुल्कापेक्षा शैक्षणिक शुल्क कमी आकारले जाते. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी पुन्हा परीक्षा घेणे किंवा अन्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेन या देशांशेजारील ७ ते ८ देशांमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्यामुळे अन्य देशांसोबत सामंजस्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल. भारतात पुन्हा येणाऱ्या विद्यार्थ्यांना (नीट) सामायिक प्रवेश परीक्षा देण्यासही मानसिकरित्या तयार करावे लागेल. त्याचबरोबर युक्रेन सरकार ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देईल का यासंदर्भातही विचार करावा लागेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले.