Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

तुघलकी फर्मान मागे घ्या, अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल – श्रीरंग बरगे

banner

मुंबई : 

एका अपहाराच्या घटनेवरून एसटीच्या सर्व वाहकांना संशयाच्या कठडयात उभे करून, वेठीस धरणे हा केवळ मूर्खपणा आहे. तसेच अपहार रोखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या खिशात हात घालून झाडझडती घेण्याचे उद्दाम परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी ताबडतोब समज द्यावी  अन्यथा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अशा उद्दामखोर परिपत्रकमुळे उद्रेक होऊन त्याचा परिणाम आंदोलनामध्ये होईल. तशी वेळ आणू नये, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

इस्लामपूर (सांगली जिल्हा) आगारांमध्ये एका वाहकाने मोबाईलमध्ये ॲप तयार करून त्याद्वारे तिकीट विक्री करून अपहार केला. त्याद्वारे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवण्याचा प्रकार घडला, ही घटना दुर्दैवी आहे. पण अशा घटनांमधून एसटीच्या तांत्रिक यंत्रणेचा दोष दिसून येत आहे. एसटीच्या मध्यवर्ती संगणकीय कक्षाचे तिकीट विक्री मशीनवर नियंत्रण असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात का आला नाही? त्यांना विचारणा करण्याऐवजी राज्यातील सर्व एसटी वाहकांची तपासणी करावी, किंबहुना महिला वाहकांचे खिसे तपासावेत असे तुघलकी फर्मान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले आहे. अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला वाहकांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. भविष्यात आपल्या कामगिरीबद्दल नैराश्य निर्माण होऊन त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये उद्रेक निर्माण होईल. त्यामुळे पूर्वी साडे पाच महिने संपात होरपळलेल्या एसटीला आणखी एका मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अशा बेजबाबदारपणे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी समज द्यावी, असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.

Related posts

मेस्टाचे १९ एप्रिलला मुंबईत वार्षिक अधिवेशन; हजारो प्रतिनिधी उपस्थित राहणार

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभला २६ जानेवारीपासून होणार सुरूवात

४९ वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा – अंतिम फेरीत सोलापूर व पुणे तर धाराशिव व नाशिक भिडणार

Leave a Comment