Voice of Eastern

पुणे :

रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे उद्गार पुण्यातील नायडू संसर्गजन्य आजाराचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाठसुते यांनी काढले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या जागतिक रेबीज दिवसानिमित्ताने ते बोलत होते. दरवर्षी २८ सप्टेंबर हा लुई पाश्चर यांचा मृत्यूदिन जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ‘वन हेल्थ झिरो डेथस’ हे या वर्षीच्या रेबीज दिनाचे घोषवाक्य आहे.

बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषधशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मालन परांडे, राज्य माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ. अशोक रणदिवे आणि राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ‘देह मंदिर चित्त मंदिर’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले. यावेळी त्यांनी रेबीज हा एक दुर्लक्षित आजार असला तरी त्यामुळे देशांमध्ये आणि राज्यात होणार्‍या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे, हे सांगून हे मृत्यू २०३० पर्यंत शून्यावर आणणे सहज शक्य आहे पण त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यामधील समन्वय, वन हेल्थ संकल्पनेनुसार करावयाची कार्यवाही, कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबाबत जनप्रबोधन आणि रेबीज प्रतिबंधक लस तसेच सिरम यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल, हे स्पष्ट केले.

डॉ. मालन परांडे यांनी रेबीज संदर्भातील सखोल माहिती श्रोत्यांना दिली तसेच श्रोत्यांच्या शंकांचे समाधान देखील केले. रेबीजमुळे होणार्‍या मृत्युमध्ये लहान मुलांचे प्रमाण मोठे असते, हे लक्षात घेता आपण याबाबत अधिक सावध असेल पाहिजे. कुत्रा चावल्यानंतर ती जखम वाहत्या पाण्याखाली साध्या साबणाने १५ मिनिटे धुतल्यामुळे रेबीज होण्याची शक्यता निम्म्याहून अधिक प्रमाणात कमी होते, हे ही त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी श्वान दंशावर पारंपरिक उपचार न घेता लस आणि सिरम वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतले तर रेबीज निर्मूलन सहज शक्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. कैलास बाविस्कर यांनी यावेळी सार्वजनिक आरोग्य संदर्भातील कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य शिक्षण हे महत्त्वाचे असून यासंदर्भात राज्य आरोग्य माहिती आणि जनसंपर्क विभाग करत असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी भारती विद्यापीठ नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी तसेच विविध विभागातील आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोक उपस्थित होते. श्री. रुपेश दरेकर आणि श्रीमती श्रावणी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. भालचंद्र प्रधान यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे रेबीज संदर्भात महत्त्वाची जनजागृती झाली असून असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता अनेकांनी यावेळी बोलून दाखविली.

Related posts

कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम स्टोरी मागे काय दडलंय?

Voice of Eastern

कोकणातील सर्वात मोठी नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी रामदास पठार ग्रामस्थांचे मंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे

विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदी

Leave a Comment