मुंबई :
मुंबई महापालिकेचे कर्मचारी म्हणजे सरकारी कर्मचारी असल्याने त्यांना सहजच कर्ज मिळते. तसेच त्यांचे कर्जही वसूल करणे सोपे असते. मात्र मुंबई महापालिकेत काम करणार्या १६ कर्मचार्यांनी एका बँकेला कोट्यवधीचा गंडा घातला आहे.
मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी असलेल्या संदीप राऊत याने एका खासगी बँकेतून कर्ज काढले होते. मात्र कर्जाचे हप्ते भरणे त्याला शक्य नसल्याने सप्टेंबर २०२१ रोजी दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या महाव्यवस्थापकांनी खासगी बँकेला पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी संदीप राऊत यांनी तुमच्या बँकेतून कर्ज घेतले असून, ते कर्ज फेडण्याची त्याची ऐपत नसल्याचे म्हटले होते. या पत्रानंतर बँकेतील अधिकारी जुगतार सिंग यांनी शहानिशा केली असता संदीपने कर्ज घेताना तो पालिकेमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत असून, त्याला दरमहा ८० हजार रुपये वेतन असल्याचे कागदपत्रे सादर केले होते. या कागदपत्रांच्या आधारेच त्याला बँकेतून कर्ज मंजूर झाले होते. त्यामुळे अन्य पालिका कर्मचार्यांनी घेतलेल्या कर्जाच्या अर्जांची शहानिशा केली असता १५ जणांनी बोगस दस्तावेज सादर केल्याचे उघडकीस आले. या १६ कर्मचार्यांनी अशाप्रकारे बँकेला तब्बल २ कोटी ८५ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार उघडकीस येताच जुगतार सिंग यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. चौकशीत मुंबई महापालिकेच्या या १६ कर्मचार्यांना जगप्रसाद निषाद याने बोगस दस्तावेज बनवून दिल्याचे उघडकीस आले. त्याला अंधेरी येथून अटक करण्यात आले असून, त्याने बोगस दस्तावेज कुठे आणि कसे बनविले. अन्य कोणाला बोगस दस्तावेज देऊन बँकेतून कर्ज मिळवून दिले आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. तर पालिकेचे १६ कर्मचारी फरारी असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.