मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य, गनिमी कावा, राजनिती, समाजकारण, अर्थकारण, व्यवस्थापन आदी संबंधित गोष्टींचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणे आवश्यक आहे, अशी मागणी शिवसेनेचे सचिव ॲड. वैभव थोरात यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबातचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कौशल्याचा अभ्यास जगभर केला जातो. परदेशातील विद्यापीठांप्रमाणे भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्येही छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या संधी उपलब्ध होत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळत आहे. त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मुंबई विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणे गरजेचे आहे’, असे ॲड. वैभव थोरात यांनी सांगितले.