शहर

‘होळी’साठी अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई; शिक्षेत कैदेचीही तरतूद

मुंबई : 

येत्या रविवारी २४ मार्च २०२४ रोजी साजरा होणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच ‘होळी’च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा महानगरपालिकेच्या ‘१९१६’ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव जितेंद्र परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये १ हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते.

आपल्या अवतीभवती असलेली निसर्गसंपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्यान अधीक्षक परदेशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *