मुंबई :
२०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यानुसार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन प्रकल्पांतर्गत क्षयरोगाच्या दृष्टीने अतिजोखीम असलेल्या घटकातील नागरिकांचे बीसीजी लसीकरण एप्रिलपासून करण्यात येणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असल्याने पात्र लाभार्थ्यांकडून लेखी संमती घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन प्रकल्पांतर्गत मुंबईच्या सर्व २४ विभागातील नागरिकांच्या क्षयरोग चाचण्या करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार मुंबईमधील १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ६ अतिजोखीम असलेल्या घटकातील व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये पाच वर्षांपासून क्षयरोगाने बाधित रुग्ण, तीन वर्षांपासून क्षयरोग रूग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, स्वयंघोषित मधुमेही, स्वयंघोषित धूम्रपान करणारे, कुपोषित आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण टप्याटप्प्याने करण्यात येणार आहे. आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांद्वारे पात्र व्यक्तींचे एप्रिल २०२४ पासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तर या नागरिकांचे मे महिन्यांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी जून, जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण ऐच्छिक असल्याने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून लेखी संमती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.