डेरवण (चिपळूण) :
येथे सुरु असलेल्या डेरवण युथ गेम्स २०२४ स्पर्धेत चौथ्या दिवशी खो खो मध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात राजेंद्र विद्यालय, खंडाळा सातारा मुलींच्या गटात राजमाता अहिल्यादेवी होळकर, सांगली या संघांनी तर १८ वर्षाखालील गटात विहंग क्रीडा मंडळ, ठाणे , तर मुलींच्या गटात ज्ञानविकास-ठाणे संघांनी विजेतेपद पटकावले.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटी ट्रस्टने आयोजित केलेल्या डेरवण युथ गेम्स स्पर्धेत झालेले अंतिम फेरीचे अत्यंत चुरशीचे आणि प्रेक्षकांना लुब्ध करणारे ठरले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उपजिल्हाधिकारी आकाश निगडे, नितीन कोल्हापुरे, यांच्या हस्ते झाले. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते जगदीश नानजकर उपस्थित होते. चार गटातील प्रथम चार क्रमांकाच्या संघांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
१४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात राजेंद्र विद्यालय, खंडाळा संघाने ज्ञान विकास, ठाणे संघावर ८-७ असा १ गुणाने निसटता विजय मिळवला. या सामन्यात प्रथमेश कुंभार आणि मयूर जाधव यांनी विजयात मोलाचा वाट उचलला. ज्ञान विकास संघाकडून विनायक भणगे विजयासाठी पराकाष्ठा केली.
मुलींच्या अंतिम सामन्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर, सांगली संघाने आर्यन स्पोर्ट्स, रत्नागिरी संघाचा ९-६ असा ३ गुणाने पराभव करीत विजेतेपद पटकावले. सांगली संघाकडून वैष्णवी चाफे उत्कृष्ट आक्रमण तर आणि वेदिका तामखडे अस्थापैळू खेळाचे प्रदर्शन केले. आर्यनच्या वैष्णवी फुटकला उत्कृष्ट आक्रमकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
१८ वर्षाखालील मुलांच्या गटात नायकवडी युवा मंच, सांगली संघाने विहंग क्रीडा मंडळ, ठाणे संघाचा ११-१३ असा १ डाव २ गुणांनी सहज पराभव केला. अयावन मुजावर चांगले संरक्षण करून तर आशिष गौतमने अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाचा वाट उचलला. विहंग संघाकडून वैभव मोरेने चांगला खेळ केला.
मुलींच्या अंतिम सामन्यात ज्ञानविकास – ठाणे संघाने आर्यन स्पोर्ट्स, रत्नागिरी संघावर ४-२ असा निसटता विजय मिळविला. ज्ञान विकासची रोषण जुनघरे उत्कृष्ट आक्रमक तर दिव्या गायकवाड स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू ठरली. आर्यन स्पोर्ट्सच्या साक्षी लिंगायतने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकाविला.