नवी दिल्ली :
५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरूष गटात महाराष्ट्रने मणिपूरचा तर महिला गटात दुसऱ्या सामन्यात मध्यभारतचा पराभव करत साखळी सामन्यात वर्चस्व राखले.
ही स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे काॅलनी, पहारगंज येथे सुरु आहे. सकाळच्या सत्रात रंगलेल्या पुरूष गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्विकारले. प्रथम संरक्षण करताना महाराष्ट्रकडून ऋषिकेश मुर्चावडे (१.५० मि. संरक्षण), प्रतिक वाईकर (२ मि. संरक्षण व १ गुण), ऋषभ वाघ २.४० मि. संरक्षण व १ गुण), सौरभ घाडगे (३ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर आक्रमणात महाराष्ट्रने १५ गुण मिळवले. मध्यंतरापर्यंत महाराष्ट्रकडे (१५-५) १० गुणांची आघाडी होती. दुसऱ्या डावात निखिल सोडिये (२ मि. संरक्षण), अक्षय भांगरे (१.४० मि. संरक्षण), विजय शिंदे (१.३० मि. संरक्षण), अक्षय मासाळ (१.४० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत महाराष्ट्रला (३०-२०) एक डाव १० गुणांनी विजय मिळवून दिला. मणीपूरतर्फे धनंजय (१ मि. संरक्षण व २ गुण) याने चांगला खेळ केला. साखळी सामन्यांमध्ये ब गटात असलेल्या महाराष्ट्र संघाने अव्वल कामगिरी केली आहे.
महिलांच्या अ गटातील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने मध्यभारतवर (४०-१०) एक डाव ३० गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (४ मि. संरक्षण), प्रियांका इंगळे (२.२० मि. संरक्षण व ८ गुण), काजल भोर (३.४० मि. संरक्षण व ८ गुण), गौरी (२.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दमदार खेळ करत चांगला खेळ केला. मध्यभारतकडून सेजल (१ मि. संरक्षण), व रोहीणी (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. दोन सामने जिंकून महाराष्ट्र संघ गटात अव्वल राहीला आहे.