शहर

कोल्हापुरकरांची पूर चिंता कायमची मिटणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे.

कोल्हापूर : 

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रिफ, मंत्री शंभुराज देसाई आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.

कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही आणि एका मतदारसंघाची देखील नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर आपण वेगळे लढत असलो तरी या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगभरात भारताचा मानसन्मान वाढला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार झपाट्याने काम करत आहेत. हे सरकार घरात बसणारे, फेसबुकवरुन काम करणारे सरकार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, शासन आपल्या दारी असे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले. कोल्हापुरकर शब्दाला पक्के आहेत. ते महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पंचगंगेचे प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने ३२०० कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. कोल्हापुरातील महापुर निवारण्यासाठी ३५०० कोटींचा आरखडा शासनाने मंजूर केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विरोधक पंतप्रधान मोदींचा व्देषाने पिडीत आहे. २०१४ आणि २०१९ प्रमाणेच २०२४ च्या निवडणुकीत जनता विरोधकांचा सुपडा साफ करेल. संविधान बदलणार अशी ओरड करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी परखड शब्दांत सुनावले. ६० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसला कधी संविधान दिन साजरा करण्याचे सुचले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून संविधान दिन सुरु केला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर संविधान कधीही बदलणार नाही, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोटला जनसागर

कोल्हापुरात ४२ डीग्री तापमान असून देखील महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचा अलोट महासागर आज कोल्हापुरकरांनी पहिल्यांदा बघितला असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापुरातील मुख्य रस्ते, गल्ली, बोळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *