मुंबई :
नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील एका खोलीला ६ एप्रिल रोजी सायंकाळी आग लागली. तेव्हापासून आजतागायत या वसतिगृहाच्या इलेक्ट्रिकचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत. या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणतीही व्यवस्था करण्यात न आल्याने अखेर सोमवारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर जाेरदार आंदोलन केले.
नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाची नव्याने उभारण्यात आलेल्या ११ मजली विस्तारित इमारतीचे नुकतेच महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र ६ एप्रिल रोजी सायंकाळी इमारतीमधील विद्यार्थ्यांचे वसतिगृह असलेल्या १० मजल्यावरील एका खोलीला अचानक आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्या खोलीतील सामान जळून खाक झाले होते. त्यामुळे वसतिगृह असलेल्या चारही मजल्यावरील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या मजल्यांवर विद्युत पुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या एका छोट्याशा सभागृहात तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या वसतिगृहामध्ये जवळपास २८० च्या आसपास मुले राहत होती. यातील बहुतांश मुले ही भितीपोटी आपल्या घरी निघून गेली होती. तर जवळपास १५० मुलांपैकी काही मुले सातव्या मजल्यावरील हॉलमध्ये, रिडिंग रूममध्ये तर काही मुले व मुलींची व्यवस्था काॅमन रूममध्ये करण्यात आली होती. मात्र या घटनेला १० दिवस उलटले तरी रुग्णालय प्रशासानाकडून कोणतीही दखल घेतली नाही. घरी गेलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तर वसतिगृहाच्या एका छोट्याशा खोलीत दाटीवाटीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वीज नसल्याने व राहण्यासांठी स्वतंत्र खोली नसल्याने त्यांच्या जेवणाची गैरसोय होत होती. त्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या. त्यांना सकाळी अंघोळ करण्यापासून नाष्टा व जेवणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अनेक विद्यार्थी ऑनलाईन जेवण मागवत आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अनेक गोष्टी चोरीला जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यातून सोमवारी वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरात जोरदार आंदोलन केले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी विद्यार्थ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी अग्निसुरक्षेच्या तपासणीसह विविध सुधारणा तातडीने करण्यात येतील. तसेच वसतिगृहातील वीज गुरूवारपर्यंत येईल, असे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
वसतिगृहातील खोलीला लागलेल्या आगीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आला आहे. त्यावर चर्चा करून झाली असून, लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी उपहारगृहामध्ये दोन वेळचे जेवण आणि नाष्टा २५० रुपयांमध्ये उपलब्ध केले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी त्याला नकार दिल्याने याबाबत कंत्राटदारासोबत चर्चा सुरू आहे.
– नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, नायर दंत महाविद्यालय व रुग्णालय