मुंबई :
अल्पवयीन विवाहितेला २८ व्या आठवड्यांत गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. याचिकाकर्तीच्या गर्भात शारीरिक दोष असल्याचे वैद्यकीय चाचणीतून उघड झाल्यानंतर न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने तिला २८ व्या आठवड्यांत गर्भपातास परवानगी दिली.
वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार, २४ व्या आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलेल्या महिलेला गर्भपातासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीची अट घालण्यात आली आहे. त्यानुसार, १७ वर्षांच्या याचिकाकर्तीने गर्भपाताच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. तिच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने तिच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश दिले होते. त्यावेळी, भ्रुणामध्ये शारीरीक दोष असल्याचा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी न्यायालयात सादर केला. याचिकाकर्ती अल्पवयीन असून एचआयव्हीग्रस्त आहे. शिवाय, तिचा बालविवाह झाला आहे. गर्भातही अनेक दोष असल्याने तिच्या गर्भपाताची शिफारस वैद्यकीय तज्ज्ञांच्या मंडळाने केली होती. मंडळाने केलेली शिफारस आणि पीडितेची मानसिक – वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने पीडितेला गर्भपात करण्यास परवानगी दिली.