मुंबई :
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनावरून बऱ्याचदा वाद निर्माण होत असतात. याची दखल घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांना पदवी आंतरवासिता, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि विशेष अभ्यासक्रमातील (सुपर स्पेशालिटी) पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमधील बेहिशोबी निधीच्या वापरामध्ये पारदर्शकता निर्माण होईल, असे मत वैद्यकीय संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पदवी वैद्यकीय आंतरवासिता आणि निवासी डॉक्क्टरांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला दिले आहेत. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पदवी आंतरवासिता, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि विशेष अभ्यासक्रमातील (सुपर स्पेशालिटी) पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दिलेल्या विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालये यांना दिले आहे. हा तपशील २३ एप्रिल २०२४ पर्यंत आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थानी त्यांच्या विद्यावेतनाचा तपशील स्वत:च्या संकेतस्थळावर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे विद्यावेतन मासिक आधारावर प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बेहिशेबी असलेल्या निधीच्या वापरामध्ये यामुळे पारदर्शकता वाढेल, असे मत वैद्यकीय संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.