मुंबई :
राज्यातील तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याने मुंबईकरांचा लस्सी, ताक आदी थंडपेये पिण्याकडे कल वाढला आहे. मात्र यामुळे मुंबईकरांच्या घशाला संसर्ग होत असून, त्यांना घशाला टोचणे, खवखवणे यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून अशा रुग्णांमध्ये ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल हा थंडगार पदार्थ खाण्याकडे व पिण्याकडे कल वाढला आहे. भर उन्हामध्ये दुपारच्या वेळेत कामानिमित्त बाहेर फिरत असलेले अनेकजण लस्सी, ताक, छास व शीतपेये पिण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र यामुळे त्यांच्या घशाला संसर्ग होत आहे तर काही जणांना टॉन्सिलचा त्रास वाढत आहे. तसेच उन्हामुळे अनेकांना पित्ताचाही त्रास होताे. पित्तामुळे घशामध्ये खवखव होते. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणारे पित्त आणि थंडपेयांच्या सेवनामुळे टॉन्सिलच्या त्रासामुळे नागरिकांना घशात खवखव होणे, गिळताना त्रास होणे, तुरळक ताप येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, मागील काही दिवसांपासून दिवसाला साधारणपणे १० ते १५ रुग्ण दररोज घशाच्या त्रासाने त्रस्त असल्याचे येत आहेत. यामध्ये मोठ्यांबरोबरच लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती बॉम्बे रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे सल्लागार डॉ. मिनेश जुवेकर यांनी सांगितले.
वाढत्या तापमानाबरोबरच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे अनेकजण बाहेरगावी जात असल्याने या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या रस्त्यावर येत असल्याने प्रदूषणामध्ये वाढ होते. वाढते प्रदूषण व धुळीमुळे नागरिकांच्या घशाला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. मागील काही दिवसांपासून घशाला संसर्ग व खवखव असल्याचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती भाभा रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागातील सहाय्यक मानदसेवी डॉ. धीरजकुमार नेमाडे यांनी दिली.
कारणांनुसार लक्षणे
वाढते प्रदूषण, उन्हामुळे थंडपेये पिण्याकडे कल आणि उष्णतेमुळे वाढणारा पित्ताचा त्रास ही घशाला संसर्ग होण्याची तीन कारणे आहेत. थंडपेयांचे सेवन केल्याने आणि वाढत्या पित्तामुळे घसा दुखणे, खवखव, घशाला टोचणे असा त्रास होतो. तर प्रदूषणामुळे घसा दुखणे, खवखवणे व ताप येतो.
काय काळजी घ्यावी
- थंडपेये पिणे टाळा
- दुपारचे उन्हामध्ये फिरणे टाळा
- साधे पाणी प्यावे
- घरातून पाणी घेऊन बाहेर पडा
- मास्कचा वापर करा